एप्रिलला काढले वनतळे; ई-निविदा जूनमध्ये

एप्रिलला काढले वनतळे; ई-निविदा जूनमध्ये

पन्हाळा वनक्षेत्रातील कारभार - खासदार फंडाचा गैरवापर होण्याची शक्‍यता

कोल्हापूर - तीन महिन्यापूर्वीच ज्या वनतळ्याचे काम पूर्ण झाले आहे, तीच वनतळी तयार करण्यासाठी जिल्हा उपवनसंरक्षकांनी २१ जूनला ई-निविदा काढली आहे. पन्हाळा वनपरिक्षेत्रातील मौजे पोहाळवाडी येथे असणारी ही वनतळी खासदार फंडातून केली जाणार आहेत. मात्र ई-निविदा काढण्याआधीच पूर्ण झालेल्या कामाचा निधी त्याच कामासाठी खर्चून गैरवापर होणार आहे. त्यामुळे वनविभागाला याची चौकशी करावी लागणार आहे. 

शासकीय कामे पारदर्शी व्हावीत, दर्जेदार असावीत, यासाठी ई-निविदा जाहीर करून ठेकेदार असो किंवा सुशिक्षित बेरोजगारांना वनतळी काढण्याचे काम दिले जाते. मौजे पोहाळवाडी येथे एकूण सहा वनतळी मंजूर आहेत. यापैकी चार वनतळी यापूर्वी पूर्ण केली होती. 

दरम्यान, पोहाळवाडी येथील जंगलकक्ष क्रमांक ९३९ मध्ये नव्याने दोन वनतळी काढली जाणार होती. यासाठी पुण्यातील खासदार अमर साबळे यांच्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत पन्हाळा वनपरिक्षेत्रात असणाऱ्या पोहाळवाडी येथे वनतळी काढली जाणार होती. वास्तविक यासाठी पहिल्यांदा ई-निविदा काढणे बंधणकारक आहे. ई-निविदेनंतर हे काम कोणाला द्यायचे हे निश्‍चित केले जाते. कामाच्या निश्‍चितीनंतर वर्कऑर्डर दिली जाते. मात्र कायदेशीर बाबींना केराची टोपली दाखवत पन्हाळा वनक्षेत्रपालांनी पोहाळवाडी येथील वनतळ्यांचे काम तीन महिन्यापूर्वीच पूर्ण करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुका पातळीवरील वनक्षेत्रात होणारा हा मनमानी कारभार जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कानोकानही नाही. कोणतेही शासकीय काम कमी बजेटमध्ये बसवायचे आणि त्याची पूर्ण रक्कम उचलायची हा 

प्रकार उपवनसंरक्षकांनी हाणून पाडला पाहिजे. पोहाळवाडीतही ज्या ठिकाणी वनतळे काढणार आहे, त्या ठिकाणची उपवनसंरक्षक कार्यालयाकडून पाहणी झालेली नाही. ज्या ठिकाणी यापूर्वीच वनतळी काढली आहेत, त्याच ठिकाणी नवीन वनतळी काढण्यासाठी ई-निविदा काढली जाते ही बाब आता गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात पूर्ण झालेल्या वनतळ्याची ई निविदा २१ जूनला म्हणजेच पंधरा दिवसापूर्वी काढली आहे. 
 

पोहाळवाडी येथील जंगलकक्ष क्रमांक ९३९ येथील वनतळे काढण्याची निविदा - 
वनतळे क्रमांक ५ व ६ साठी निधी : १९ लाख ७६ हजार ८८३ रुपये
निविदा डाऊनलोड झालेली तारीख : १३ जून ते २० जून २०१७
ऑनलाईन निविदा फॉर्म भरणे : १३ जून ते २० जून २०१७
निविदा उघडण्याची तारीख : २१ जून २०१७
प्रत्यक्ष काम पूर्ण : एप्रिल २०१७

ई-निविदा काढून ठेका दिला जातो. वर्कऑर्डर दिल्याशिवाय कोणताही ठेकेदार काम करू शकत नाही. पोहाळवाडी येथे ई-निविदा काढण्याअीधीच वनतळ्याचे काम झाले असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
- डॉ. प्रभुनाथ शुक्‍ला,उपवनसंरक्षक, कोल्हापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com