स्वागतम्‌ शुभ स्वागतम्‌!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

कोल्हापूर - ढोलांचा दणदणाट टिपेला पोचलेला. फुलांच्या पायघड्या-रांगोळ्या सजल्या होत्या अन्‌ येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन स्वागतही होत होते. मिकीमाऊससारखे बालमित्रांचे सवंगडीही दिमतीला होते. स्वागतम्‌ शुभ स्वागतम्‌ अशा उत्साही माहोलात आज शहरासह जिल्ह्यातील शाळांत नवागत विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत झाले.  

कोल्हापूर - ढोलांचा दणदणाट टिपेला पोचलेला. फुलांच्या पायघड्या-रांगोळ्या सजल्या होत्या अन्‌ येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन स्वागतही होत होते. मिकीमाऊससारखे बालमित्रांचे सवंगडीही दिमतीला होते. स्वागतम्‌ शुभ स्वागतम्‌ अशा उत्साही माहोलात आज शहरासह जिल्ह्यातील शाळांत नवागत विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत झाले.  
दोन महिन्यांच्या सुटीनंतर आज शाळेचा पहिला दिवस. साहजिकच घराघरांत सकाळपासूनच लगबग सुरू झाली. दोन महिने विश्रांती मिळालेले दफ्तर दिमाखात भरले गेले. वॉटरबॅग खांद्याला मारून पालकांसह विद्यार्थी मंडळी सकाळी सातलाच बाहेर पडली. बहुतांशी शाळांत प्रभातफेऱ्यांचे आयोजन झाले. सकाळी नऊपासूनच शाळाशाळांत प्रवेशोत्सवाची धांदल सुरू झाली. रांगोळ्या सजल्या. तोरणं बांधली गेली. विविधरंगी फुलांच्या माळा आणि तोरणांनी प्रवेशद्वारे सजली. तितक्‍यात विद्यार्थी आणि पालकांची पावले शाळेकडे वळू लागली. गुलाबपुष्प देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत सुरू होते. सीनिअर विद्यार्थी या नवागतांच्या स्वागतात तर समरसून सहभागी झाले. शाळेच्या पहिल्या तासाची घंटा वाजली. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पहिला तास सुरू झाला. काही शिक्षक नव्याने शाळेत आलेले. त्यांची सर्वांशी ओळख परेडही रंगली. मधल्या सुटीदरम्यान शाळेच्या मैदानावर खेळण्याचा आनंदही अनेकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. ‘ये उद्या ये रे..’ असे निरोप एकमेकांना देत सारी मंडळी घराकडे परतली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांचे स्वागत
दरम्यान,जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी आज मुलांचे स्वागत करत उत्साही वातावरणात शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्यात आली.काही ठिकाणी शाळांचा परिसर फुलांनी सुशोभीत करण्यात आला होता. काही ठिकाणी मुलांना वाजत गाजत शाळेत आणण्यात आले. पहिली प्रवेश घेतलेल्या मुलांचे फुले देऊन स्वागत झाले.काही ठिकाणी खाऊचे वाटप करण्यात आले.

आमदार सुरेश हाळवणकर यांनी संजीवन विद्यामंदिर चंदूर (ता.हातकणंगले) आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी मिणचे विद्यामंदिर (ता.हातकणंगले), आमदार उल्हास पाटील यांनी कन्या विद्यामंदिर दत्तनगर (ता.शिरोळ), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी कुमार व कन्या मंदिर गडमुडशिंगी (ता.करवीर) उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी कुमार विद्यामंदिर कळे (ता.पन्हाळा,) शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांनी गलगले (ता.कागल) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी कन्या विद्यामंदिर, वाकरे (ता.करवीर) उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी कोथळी विद्यामंदिर (ता.करवीर) शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी कुमार व कन्या विद्यामंदिर कुंभोज (ता.हातकणंगले) शाळेस भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.