बाहेरची कामे करणाऱ्यांवर कारवाई कधी?

बाहेरची कामे करणाऱ्यांवर कारवाई कधी?

कोल्हापूर - पोलिस ठाण्यात राहून ठाण्यातील कामापेक्षा ‘बाहेर’चीच कामे अधिक करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे खूप चांगले पाऊल पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी उचलले. या कामात मास्टर मानल्या जाणाऱ्या करवीर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, एलसीबी अशा मधील संबंधित घटकांवर कारवाई कधी होणार याकडे साऱ्या पोलिस खात्याचे लक्ष्य लागून आहे. नव्या बदलानुसार एका अधिकाऱ्याने या खास कामासाठी खासगी व्यक्तीची नियुक्ती केल्याचे समजते. 

ठाण्यात साहेबांच्या ‘मर्जी’तल्या आणि ‘कलेक्‍टर’ यांना मोठा मान असतो. हे काम करणाऱ्या पोलिसांना ना हजेरी, ना गणवेश, वेळेचे बंधन. इतकेच नव्हे तर गुन्ह्याचा तपास आणि बंदोबस्तही नसतो. साहेबांचा फोन आल्यावरच ठाण्यात यायचे. नाहीतर इतर वेळी वाहनावरून कडक इस्त्रीचे कपडे घालून गॉगल लावून हिंडताना अगर ठरावीक भागात जाताना स्वारी सर्वांच्या नजरेस पडणार. 

त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाही. त्यामुळे ही प्रवृत्ती वाढू लागली. याबाबतची माहिती वरिष्ठांनाही असते, मात्र हताची पाचही बोटे सारखी नसतात. म्हणून यापूर्वी या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र या प्रवृतीबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे थेट तक्रारी येण्यास सुरवात झाली. त्याची गंभीर दखल घेत काल अधीक्षक मोहिते यांनी तीन ‘कलेक्‍टर’च्या तडकाफडकी बदल्या केल्या. त्यांच्या या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले. ही कारवाई येथेच न थांबता व्यापक बनावी, अशी अपेक्षा खुद्द पोलिस खात्यातून व्यक्त होत आहे. 
चौघे बाहेरच्या कामात व्यस्त 

पोलिस खात्यातील सर्वोच्च पुरस्कार घेतलेल्या आणि लॅपटॉप मागणीच्या कारणावरून तडकाफडकी बदली झालेल्या पोलिसांकडून पोलिस ठाण्याबाहेरचीच कामे आजही केली जात असल्याचे समजते. जिल्ह्यातील गुन्ह्यांवर अंकुश ठेवणाऱ्या पोलिस यंत्रणेतील चौघे ‘बाहेर’च्याच  कामात व्यस्त असतात. त्यातील एक जण फक्त फोटोचा हार आणतो, त्यानंतर सोपवलेल्या ‘बाहेर’च्या कामाला लागतो. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, करवीर आदी ठाण्यात नाम्या, आण्ण्या, संद्या, अज्या, साग्या, भैय्या, संज्या, बाळ्या आदी मंडळी पोलिस ठाण्या ‘बाहेरी’ल कामात व्यस्त असतात. त्यांच्याकडून काही कामात झिरो पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचीही चर्चा आहे. 

प्रतिमा सुधारायची असेल तर....
राजारामपुरीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी पारदर्शक पद्धतीने चांगले काम केले. राजारामपुरी हद्दीतील अवैध धंदे, गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. त्यांच्या कामाचे आजही कौतुक होते. पोलिस खात्याची प्रतिमा सुधारायची असेल तर ‘बाहेर’ची कामे करणाऱ्या घटकांवर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. पोलिस अधीक्षक मोहिते यांच्यावर कारवाईचे कोणते पाऊल उलचलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com