वसा ‘दंगल गर्ल’ घडविण्याचा...

वसा ‘दंगल गर्ल’ घडविण्याचा...

कोल्हापूर - शारीरिक स्वास्थ्य पैशाने विकत मिळत नाही, ते कमवावे लागते. त्यासाठी तालमीत या... असा कानमंत्र देऊन महिलांना तालमीशी जोडणाऱ्या आणि ऑलिम्पिक दर्जाची महिला कुस्तीपटू तयार करण्याने ध्येयवेड्या झालेल्या अनिता जयवंत पाटील या अविरतपणे प्रयत्न करत आहेत. हिरवडे (ता. करवीर) येथे अनिता यांचा जन्म झाला. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांचे झाले. त्यांचा गावातीलच जयवंत पाटील यांच्याशी १९९६ ला विवाह झाला. त्यानंतर कुटुंब उचगाव (ता. करवीर) येथे स्थायिक झाले.

जयवंत यांनी रेडियमचा व्यवसाय सुरू केला. त्यात जम बसला. त्यांनी घर बांधले. मात्र, त्यांच्या तीन पिढ्या या तालमीशी जोडल्या गेलेल्या. पत्नीने केवळ घरात बसू नये. तिनेही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहावे, असे जयवंत यांना वाटत होते. १९९८ पासून ते अनिता यांना कृषी विद्यापीठाच्या मैदानावर पहाटे फिरायला घेऊन जाऊ लागले. त्या वेळी पतीचा ‘वॉर्मअप’ त्या बघायच्या. हळूहळू अनिता यांनी तो करण्यास सुरुवात केली. त्यातून गोडी लागली. सासू ‘लक्ष्मी’ आणि सासरे ‘दादू पाटील’ यांच्या प्रोत्साहनाची भर पडली. 

तालमीची आवड असल्याने पती जयवंत यांनी २०११ ला घरच्या तिसऱ्या मजल्यावर स्वखर्चाने तालीम बांधली. तेथे त्यांनी निःशुल्क परिसरातील लहान मुलांना कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. तालमीत पत्नी ‘अनिता’ हिनेही मेहनत करावी, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. पती, मुलांकडून त्यांनी जोर, बैठका, सपाट्या यासारख्या कसरतीपासून ते कुस्तीचे डावपेचही आत्मसात केले. त्यांनी मैदान आणि तालमीशी केलेल्या मैत्रीमुळे ४६ व्या वर्षातही त्यांनी २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल, अशी शारीरिक तंदुरुस्ती निर्माण केली. शाहू मॅरेथॉनमध्ये प्रौढ गटात पहिला क्रमांक मिळवला. तर उद्या (ता. ८) महिला दिनादिवशी अर्ध्या तासात ३५० सपाट्या मारण्याचा विक्रम करण्याचा मानस केला आहे. फावल्या वेळेत शिवणकाम करून घराला हातभार लावत आहेत. 

परिसरातील लहान मुलींना तालमीची गोडी लावायची, इतकेच नव्हे तर त्यातून एखादी ऑलिम्पिक दर्जाची कुस्तीपटू तयार करून पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. तालमीत अनिता यांना अंग मेहनत करताना, लाल मातीत कुस्तीचे मुलींना प्रशिक्षण देताना महिला पाहायच्या. यातून त्यांनी फिगर मेंटेन करण्यासाठी मोठ्या जीमला जाण्याची गरज नाही, हे जाणलं. दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत अनिता या २२ ते २३ महिलांना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देऊ लागल्या. त्याचबरोबर आठ ते दहा लहान मुलींना त्या कुस्तीचे डावपेचही नियमित शिकवतात. 

पती जयवंत यांच्यासह सासू-सासऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत मला मैदान-तालमीची गोडी लावली. ऑलिम्पिकमध्ये चमकणारी एक महिला कुस्तीपटू जीवनात निश्‍चित तयार करायची आणि पतीचे स्वप्न पूर्ण करायचे, हेच ध्येय आहे. 
- अनिता जयवंत पाटील,
कुस्ती प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com