चाकोरीबाहेरील ‘पॅडवुमन’...

चाकोरीबाहेरील ‘पॅडवुमन’...

कोल्हापूर - महिलांच्या आरोग्य समस्यांशी संबंधित अनेक गंभीर विषय आहेत. नैतिक तत्त्वांचे कारण पुढे करून आजवर ते वर्ज्य ठरविले. असाच एक विषय असलेल्या मासिक पाळीसंबंधी उघडपणे चर्चा करण्यास अजूनही महिला, मुली संकोचतात. ग्रामीण महिला आणि मुली परंपरांच्या जोखडात अजूनही अडकल्या आहेत. अशा परिस्थितीत हेर्ले (ता. हातकणंगले) येथील दीक्षा अलमान यांनी सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचा गृहउद्योग सुरू केला. चाकोरीबाहेरचा विचार करत त्या ‘पॅडवुमन’ बनल्या. सौ. दीक्षा कोणत्याही मोठ्या कंपनीने बनविलेल्या नॅपकिनइतकेच वापरण्यास सुलभ आणि दर्जेदार हॅण्डमेड सॅनिटरी नॅपकिन्स बनवतात. 

पती दिग्विजय, सासूबाईंची खंबीर साथ त्यांना मिळते. त्यांनी Freedom हा स्वतःचा ब्रॅंड तयार केला. एका पॅकेटमध्ये ४० रुपयांना सहा पॅडस्‌ दिली जातात. मासिक पाळी दरम्यान महिलांचे वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छता यासाठी सॅनिटरी पॅडस्‌ ही गरज बनली. पाळी दरम्यान पारंपरिक पद्धतीने कापड वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. महिलांत जागृती करण्याचे कामही सौ. दीक्षा करतात. श्री. अलमान व्यावसायिक दृष्टीने मेडिकल स्टोअर्समध्ये या पॅडस्‌चे मार्केटिंग करतात.

वर्षभरापूर्वी सौ. व श्री. अलमान यांनी सॅनिटरी पॅडस्‌ बनविण्यासाठी मशीनची खरेदी केली. मात्र, हे मशीन सदोष असल्यामुळे मशीनची एक ते दीड लाखाची गुंतवणूक वाया गेली. मात्र, त्यांनी हार मानली नाही. पॅडस्‌ची रचना लक्षात घेऊन आवश्‍यक सामग्रीने हाताने कटिंगला सुरुवात केली. नंतर सर्व पॅडस्‌चा एकसमान आकार ठेवण्यासाठी त्यांनी प्लायवूडचा सांगाडा तयार केला.

स्वतःच स्वतःच्या समस्या समजून घ्या
सौ. दीक्षा सासूबाईंच्या मदतीने दिवसाला साधारणपणे शंभर पॅडस्‌ बनवितात. अगदी कमी मनुष्यबळात घरचे सारे व्याप सांभाळून त्यांनी हा गृहोद्योग उभारला. महिलांनी कोणाची वाट पहात न बसता स्वतःच स्वतःच्या समस्या समजून घ्याव्यात. स्वतःच उपाय शोधावा. ‘लोक काय म्हणतील’ याला बळी न पडता आपल्याला योग्य वाटणारी प्रत्येक बाब अंमलात आणली पाहिजे, असे सौ. दीक्षा यांनी सांगितले.

‘‘पती दिग्विजय यांनी सॅनिटरी पॅडस्‌चा गृहउद्योग सुरू करण्याची प्रेरणा दिली. प्लास्टिक बॅकशीट, वूड पल्प, जेल शीट (ॲब्सॉर्बिंग मटेरियल), ओनियन शीट यांचा पॅडमध्ये वापर केला. यूव्ही लाईट स्टेरिलायझरच्या मदतीने पॅडस्‌चे निर्जंतुकीकरण केले जाते. सध्या सर्वच कंपन्यांच्या पॅडस्‌मध्ये प्लास्टिकचा वापर होतो. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने जैव विघटनशील पॅडस्‌ तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’
- दीक्षा अलमान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com