महादेवराव महाडिक यांची समजूत कोण काढणार

महादेवराव महाडिक यांची समजूत कोण काढणार

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने मित्र पक्षांसोबत आघाडी करत कमळ फुलवले. यावेळी पदाधिकाऱ्यांसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. पहिल्यांदा काँगेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांना संधी देण्यात आली. आता सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अध्यक्षांचा राजीनामा मागणार कोण आणि महादेवराव महाडिक यांची समजूत कोण काढणार, यावरच खांदे पालटाचे घोडे अडले आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीपूर्वी मंत्री पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन पक्षातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग केले. आमदार हाळवणकर यांनी राष्ट्रवादीचे खजिनदार अरुण इंगवले यांना भाजपत घेताना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची ऑफर दिली. भाजप नेत्यांनीही ती मान्य केली होती.

दरम्यान अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पडद्यामागून अनेक घडामोडी केल्या. या आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपने तोडीस तोड उमेदवार म्हणून महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक याना उमेदवारी दिली. त्यामुळे अरुण इंगवले यांचे नाव आपोआपच मागे पडले.

 मंत्री पाटील यांच्या सहकार्याने महाडिक यांनी अध्यक्ष पदासाठी सर्व ताकत लावली. साम, दाम, दंड या सर्वाचा वापर करत अध्यक्षपदाचा मार्ग सुकर केला. त्यांची ही तयारी पाहून अध्यक्षपदाच्या रेस मधून राहुल पाटील यांनी माघार घेतली आणि शौमिका महाडिक अध्यक्ष बनल्या.  सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना महाडिक यांचा राजीनामा होईल आणि भाजपसह इतर घटक पक्षातील सदस्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.   

सव्वा वर्ष होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांच्याकडे असलेल्या महिला बालकल्याण सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अध्यक्षांनी राजीनामा दिलेला नाही.  अध्यक्षांनी राजीनामा दिला तरच इतर पदाधिकारी राजीनामा देणार आहेत. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा यासाठी घटक पक्षाचे नेते असलेल्या आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सत्यजित पाटील सरूडकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे.  मात्र या राजीनाम्याबाबत महादेवराव महाडिक यांचेशी चर्चा करणार कोण, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com