कोल्हापूर "पॅकेज' विकणे आहे...(अस्सल कोल्हापुरी )

kolhapur packege for sale
kolhapur packege for sale

नेते मंडळी आली तर श्रेयवाद आला... त्याला विरोधक आले. प्रशासन आले तर कागदपत्रे आली, चालढकल आली. पण या दोघांनाही फाटा देऊन केवळ एका हॉटेलमालक संघाच्या पुढाकारातून कोल्हापूर पॅकेजमध्ये विकण्याची सुरवात "कोल्हापूर पर्यटन महोत्सवा'तून झाली. नेते मंडळी आणि प्रशासनाला बाजूला ठेवल्यामुळेच या पर्यटन महोत्सवातील ठरवलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या. अर्थात त्याला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला असला तरीही त्याची सुरवात झाली येथेच त्याचे यश आहे. 
पर्यटन शक्‍यतो ऑक्‍टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये किंवा एप्रिल, मे, जूनदरम्यान होते. विशेष करून या कालावधीत कमी-जादा प्रमाणात शाळांना सुटी असते. हाच धागा पकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोल्हापुरात पर्यटन महोत्सव भरविण्याचे नियोजन झाले; मात्र त्यामध्ये नेते मंडळी आणि प्रशासन असल्यामुळे त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. हा कोल्हापूरकरांचा नेहमीचाच अनुभव येथेही आला. अखेर आचारसंहितेचे कारण सांगून या दोघांनीही अंग काढून घेतले. घेणे भागच पडले. अशा परिस्थितीत हॉटेलमालक संघाच्या प्रयत्नांचा, नियोजनाचा खरा कस लागला. त्यांनी कोल्हापूर दर्शनची बस सुरू केली. गाइड (?) केअर टेकर तयार केले. वेबसाइट, सोशल मीडियांच्या माध्यमातून "कोल्हापूर पॅकेज'चे मार्केटिंग केले. अर्थात हे दर इतर टूरपेक्षा जादाच होते. तेही शाळांना सुटी नसलेल्या कालावधीतील. तरीही याला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आपुलकीची सेवा यासाठी महत्त्वाची ठरली. स्थानिक नागरिकांसह इतर जिल्ह्यांतील, राज्यातील पर्यटकांनी कोल्हापूर दर्शनच्या बसचा लाभ घेतला. छोट्या मोठ्या दोन-तीन दिवसांच्या टूरची ही मागणी हॉटेलमालक संघाने यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. 
माध्यमांची साथ मिळाली तर अनेक अवघड गोष्टी सोप्या होतात. कोल्हापूर पर्यटन महोत्सवातही असेच झाले. उणेदुणे काढण्यापेक्षा माध्यमांनी सकारात्मकता दाखवली. महोत्सवातील ही एक जमेची बाजू होती. महोत्सवातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे थेट पर्यटन होते. यापूर्वी केवळ सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे "महोत्सव' असे असलेले समीकरणच या महोत्सवाने बदलून टाकले. ते अपेक्षितही होते. तरीही हॉटेलमालक संघाने आपलाच फायदा पाहण्याचा प्रयत्न केला; मात्र पत्रकार परिषदेत माध्यमांनी त्यावर केलेल्या प्रश्‍नांच्या सरबत्तीनंतर त्यांनी तातडीने कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल, झुणका भाकर, हुपरीचे चांदीचे दागिने पर्यटकांपर्यंत पोचतील, असे नियोजन केले. आणि त्यालाच पर्यटकांनी पसंती दिली. वीस जणांच्या पर्यटकांच्या ग्रुपला कोल्हापुरी भेट म्हणून दिलेल्या वस्तूंत गूळ, चप्पल, कोल्हापूर साज देण्यात आले. यानंतर सर्वच पर्यटकांनी एक दिवस कोल्हापूरची ही बाजारपेठ जवळून पाहिली, खरेदी केली. कोल्हापूर "पॅकेज'मध्ये विकता येते याचे हे एक यशस्वी उदाहरण ठरले. महोत्सवाचा कालावधी चुकीचा ठरला असला तरीही एप्रिल-मेमधील बुकिंगचा आकडा तब्बल दहा हजारांवर पोचला, हे या महोत्सवाचे यशच म्हणावे लागेल. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com