कोल्हापूर-रत्नागिरीचे होणार चौपदरीकरण

कोल्हापूर-रत्नागिरीचे होणार चौपदरीकरण

कोल्हापूर - कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक १६६ चे लवकरच रुंदीकरण होऊन हा मार्ग चौपदरी होणार आहे. त्यासाठी ४२ गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली असून त्यावर हरकत घेण्यासाठी आजपासून २१ दिवसांचा कालावधी जाहीर केला आहे. शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. त्याचा तपशील भूसंपादन अधिकारी क्रमांक सहा यांच्याकडे उपलब्ध आहे. 

लेखी हरकतीही त्यांच्याकडेच द्याव्या लागणार आहेत. कोल्हापूर आणि कोकणला जोडणारा १६६ क्रमांकाचा राज्यमार्ग सध्या वाहतुकीस अपुरा पडत आहे. अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. कोकणला जोडणारा हा मार्ग इतर मार्गांपेक्षा अधिक वापरात आहे. याच बरोबर पुणे-बंगळूर महामार्गावरून कोल्हापूर मार्ग रत्नागिरीला जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सध्या अरुंद असलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी नुकताच नवी दिल्लीतील केंद्रशासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांनी भूसंपादनाचे नियोजन केले आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्‍यातील २४ गावांतील भूसंपादन होणार आहे. यामध्ये आंबा, तळवडे, केर्ली, निळे, करुगळ, येलूर, जाधववाडी, पेरीड, कोपरडे, चनवाड, ससेगाव, करंजोशी, भैरीवाडी, सावे, गोगवे, बांबवडे, उमकेवाडी, वाडीचरण, डोगोली, खुलटाळवाडी आदी गावांचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्‍यातील १० गावांचा समावेश आहे. यामध्ये आवळी, पैजारवाडी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, आंबवडे, पिंपळे, दानेवाडी, कुशिरे आदी गावांचा समावेश आहे. तसेच करवीर तालुक्‍यातील आठ गावांचा समावेश असून त्यामध्ये केर्ले, पडवळवाडी, केर्ली, निगवे दुमाला, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये यांचा समावेश आहे.

शेती, खासगी जमीन, बिनशेती, ग्रमपंचायतीची जमीन अशा सर्वांचा यात समावेश आहे. त्यांचे सिटीसर्व्हे क्रमांक, गट क्रमांक ही अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहेत. ज्यांना भूसंपादनाबाबत अक्षेप असेल त्यांनी त्यांच्या हरकती लेखी स्वरूपात उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी क्रमांक सहा यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडाव्या लागणार आहेत. त्यासाठी २१ दिवसांची मुदत आहे. यानंतर सक्षम अधिकाऱ्यांकडून हरकतीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आणि चौकशीसाठी मुदत दिली जाणार आहे. त्यानंतरच त्याचे रेखांकन अंतिम केले जाणार आहे. आक्षेप स्वीकारणे किंवा नाकारणे हा सर्वाधिकार सक्षम प्राधिकाऱ्यांकडे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com