निविदा निघण्याआधीच तबक उद्यानात स्वच्छतागृह

kolhapur
kolhapur

वनक्षेत्रपालांच्या हेतूवर संशय : पर्यटकांच्या गैरसोयीचा फायदा

कोल्हापूर - निविदा निघण्याआधीच किंवा मंजूर होण्याआधीच पन्हाळा गडावरील तबक उद्यानात स्वच्छतागृहाचे बांधकाम केले आहे. महिन्यापूर्वीच याचे 60 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. कोणत्याही मंजुरीशिवाय वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्वच्छतागृह बांधण्याची परवानगी दिलीच कशी? वनक्षेत्रपालांच्या संगनमाताशिवाय हे काम अशक्‍य आहे. पारदर्शक आणि दर्जेदार काम होण्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाइन निविदा प्रक्रियेचा फज्जा उडविणाऱ्या पन्हाळा वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांच्या हेतुवर संशय घेतला जात आहे.

पन्हाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. स्वच्छतागृहाअभावी पर्यटकांची गैरसोय होते. यातच तबक उद्यानात नेहमीच गर्दी असते. तेथे पर्यटकांची विषेशत: महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छतागृह बांधण्याच्या सूचना राज्य सचिव व जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली होती, मात्र हे काम करताना निविदा न काढता किंवा कोणताही ठेकेदाराकडून काम पूर्ण करा म्हणून सल्ला दिला नव्हता; पण पन्हाळा वनक्षेत्रपाल प्रशांत तेंडुलकर यांनी निविदा प्रसिद्ध होण्याआधीच एका ठेकेदाराकडून हे काम 60 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण करून घेतले आहे. दरम्यान, याबाबत तेंडुलकर यांना विचारले असता ते म्हणाले, ""संबंधित ठेकेदाराला हे काम करू नको, असे सांगितले होते, पण त्याने ते टेंडर आपल्यालाच मिळणार आहे, असे सांगून काम केले आहे.''

शासकीय काम पारदर्शक किंवा दर्जेदार होण्यासाठी ई टेंडरिंग प्रक्रिया राबवली जात आहे. ई टेंडरिंग प्रक्रियेचा फज्जा उडत असताना केवळ ठेकेदाराकडून स्वत:च्या हिमतीवर हे काम केले म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण वाटत आहे.

जंगलातील वाळलेली लाकडाची मुळे घेऊन जाणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर कारवाई करणारे वनअधिकारी एवढे मोठे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कसे मेहरबान झाले, याचे उत्तर प्रशासनाने घ्यायला हवे. बोलण्यात बॅटींग करणारे अधिकारी सर्व काही मॅनेज करता येते अशा अविर्भावात आहेत.जलयुक्तशिवार असो किंवा स्वच्छतागृह बांधकाम असो कोणताही कामात दर्जेदार कामे झाली पाहिजेत, असा शासनाचा आग्रह असताना निविदा निघण्याआधी काम करून घेणाऱ्या अधिकारी शासनाच्या याच आग्रहाला काळिमा फासत आहेत.

हे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे, यात कोणाचेच दुमत नाही. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, हेही तितकेच खरे आहे; पण पर्यटकांच्या गैरसोयीचा फायदा घेत मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून चुकीचा मार्ग अवलंबणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये "टक्केवारी'चे गणित मांडले जात असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे.

दीड महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराचे याच ठिकाणी एक काम होते. त्याने ते पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या साहित्यातून स्वच्छतागृहाचेही बांधकाम सुरू केले होते. त्याला हे काम करू नको, असे सांगितले होते, तरीही त्याने ते काम केले; पण अद्याप या कामाचा एकही रुपया कोणाला दिलेला नाही. तबक उद्यानातील स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्याची निविदा आता निघाली आहे. ती निविदा मंजूरही झाली आहे. त्यानुसार याचे काम आत सुरू होईल.
प्रशांत तेंडुलकर
पन्हाळा वनक्षेत्रपाल.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com