शहरातील वाहतुकीला येत्या 31 मार्चपर्यंत शिस्त लावणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नंबर प्लेटवर नेत्यांचे चेहरे
वाहनांच्या नंबर प्लेटवर नेत्यांचे फोटो असणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कशी कारवाई करावी, असा प्रश्‍न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली; पण जाता जाता त्यांनी पोलिसांनी जरूर ती कारवाई करावी. शिस्त लावलीच पाहिजे या मताचा मी आहे, असे स्पष्ट केले.

कोल्हापूर : नगरविकास विभागाकडील निधीची तरतूद करून कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्थेला 31 मार्चअखेर शिस्त लावली जाणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना पोलिस अधिकारी आणि पुण्याच्या ट्रॅफिक इंजिनिअरना दिल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रस्त्याकडेला पडलेल्या बेवारस वाहनांच्या विल्हेवाटीसाठी प्रसंगी राज्यभर कायदा बदलावा लागला तरीही तो बदलण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यांनी आज पोलिस मुख्यालयात प्रमुख अधिकारी, जाणकारांची बैठक घेतली.

कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये ट्रॅफिक जॅम आणि रस्ते अपघात यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यानुसार 31 मार्चपर्यंत या सर्व समस्या सोडविण्यात येतील आणि वाहतुकीला शिस्त लावण्यात येईल, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनाही काही सूचना केल्या. जाहीर आवाहन करा, मोटारींच्या क्रमांकावरून मालकांशी संपर्क साधा, पण रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस मोटारी हलवा, असा आदेश आपण अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील वाहतुकीच्या समस्येचा आढावा त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून घेतला. स्पीडब्रेकरपासून हायमास्ट दिव्यांपर्यंतची माहिती त्यांनी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्‍नांत स्वतः लक्ष घालतात. त्याच पद्धतीने मी आता कोल्हापुरातील वाहतुकीच्या प्रश्‍नात लक्ष घातले आहे असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी गर्दीची आणि वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्‍चित केली आहेत. मात्र केवळ माहिती देऊ नका; त्यावर उपाय सुचवा, केवळ चर्चा नको; जबाबदारी निश्‍चित करा, वेळ ठरवून घ्या आणि कामाला लागा. 31 मार्चपर्यंत शहरातील वाहतुकीची समस्या मिटलीच पाहिजे, असेही अधिकाऱ्यांना सांगितल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. मूळचे पुण्याचे आणि अमेरिकेत शिक्षण घेतलेले ट्रॅफिक इंजिनिअर प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाने पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी काम सुरू करण्याच्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.

नंबर प्लेटवर नेत्यांचे चेहरे
वाहनांच्या नंबर प्लेटवर नेत्यांचे फोटो असणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कशी कारवाई करावी, असा प्रश्‍न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली; पण जाता जाता त्यांनी पोलिसांनी जरूर ती कारवाई करावी. शिस्त लावलीच पाहिजे या मताचा मी आहे, असे स्पष्ट केले.

नियमात राहा; पण मुलाहिजा बाळगू नका!
पाहिजे तितके ब्रेथऍनालेसिस घ्या. पण ड्रंक आणि ड्राइव्ह थांबविण्याचा प्रयत्न करा. आवश्‍यक तेथे पंधरा दिवसांत स्पीडब्रेकर बसवा. वाहतुकीस अडथळा होणारे अतिक्रमण तातडीने काढून घ्या. नागरिकांच्या, वाहनधारकांच्या अडचणी समजावून कारवाई करा. कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका. नियमात राहूनच काम करा. आवश्‍यक ते सर्व देण्याची तयारी आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.

Web Title: kolhapur traffic to be disciplined