कोल्हापूर झेडपीत त्रिशंकु स्थिती

कोल्हापूर झेडपीत त्रिशंकु स्थिती

दोन्ही काँग्रेसला संधी - भाजपाची जोरदार मुसंडी, सेनेने साथ दिल्यास महायुती सत्तेवर

कोल्हापूरः राजकीय विश्‍लेषकाचे अंदाज चुकवत मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून संपूर्ण निकालानंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. दोन्ही काँग्रेसला बहुमतासाठी आठ सदस्यांची गरज आहे, त्यांना अपक्षांसह स्थानिक आघाडीने साथ दिली तर दोन्ही काँग्रेस सत्तेवर येईल, तर शिवसेनेने भाजपाला साथ दिली तर अध्यक्ष भाजपाचा होईल, अशी शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेसाठी मंगळवारी (ता. 21) चुरशीने 77 टक्के मतदान झाले होते. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पाडली. पहिला निकाल गगनबावडा तालुक्‍याचा लागला. या तालुक्‍यातील दोन्ही जागा जिंकत काँग्रेसने विजयी सलामी दिली. मात्र काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या करवीर, हातकणंगलेसह चंदगड, आजरामध्ये या पक्षाचे पानिपत झाले.

दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीने मात्र जोरदार मुसंडी मारली असून पक्षाच्या चिन्हावर 14 उमेदवार विजयी झाले आहेत. मावळत्या सभागृहात केवळ एक सदस्य भाजपाचा होता. त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या ताराराणी आघाडीलाही पाच जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेनेही यावेळी दहा जागांवर विजय मिळवला आहे. सेना-भाजपा युती झाल्यास ताराराणी आघाडीचेही पाच सदस्य या आघाडीसोबत राहतील. त्यानंतर या आघाडीचे संख्याबळ 29 होईल, नगरपालिका निवडणुकीत भाजपासोबत राहीलेल्या जनसुराज्य शक्‍तीलाही सहा जागा मिळाल्या आहेत. भाजपा-सेना-ताराराणी-जनसुराज्य अशी आघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होण्याची शक्‍यता आहे. हे गणित शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून आहे. मुंबईत शिवसेना भाजपाला सोबत घेणार का, यावर कोल्हापुरातील ही आघाडी अवलंबून आहे.
सद्यस्थितीत काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 11, शाहू आघाडीचे दोन, एक अपक्ष, दोन आवाडे गटाचे असे 32 सदस्य होतात. बहुमतासाठी 34 सदस्यांची गरज आहे. चंदगड तालुक्‍यात राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजापा आघाडीतून विजयी झाले आहेत. आमदार संध्यादेवी कुपेकर यांना मानणाऱ्या या दोन सदस्यांचा पाठिंबा काँग्रेस आघाडीला मिळाल्यास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची शक्‍यता आहे. भाजपने ही सत्ता स्थापनेसाठी शिवसेनाची चर्चा सुरू केली. शिवसेना बरोबर आल्यावर भाजपच्या 14, शिवसेनेच्या 10, स्वाभिमानी संघटना 2, जनसुराज्य 6, ताराराणी आघाडी 3 अशी सत्तेची गोळाबेरीज होवू शकते.

कोल्हापूर जिल्हा परिषद 67 जागा
भाजप - 14
काँग्रेस- 14
राष्ट्रवादी काँग्रेस- 11
शिवसेना - 10
जनसुराज्य - 6
भूदरगड आघाडी - 2
चंदगड (युवक क्रांती आघाडी)- 2
स्वाभिमानी - 2
ताराराणी आघाडी पक्ष- 3
अपक्ष( शिंगणापूर )- 1
आवाडे गट - 2.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com