जि. प. अध्यक्षांसमोर आव्हानांचा डोंगर 

जि. प. अध्यक्षांसमोर आव्हानांचा डोंगर 

कोल्हापूर - भाजपसह आठ मित्र पक्षांची सत्ता, त्यात शिवसेनेचे तीन गट आणि प्रबळ विरोधक, अशा परिस्थितीत काम करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असणार आहे. त्यात पदाधिकारी व सदस्यांच्या मर्यादित राहिलेल्या अधिकारांचाही अडसर असेल. सौ. महाडिक उच्चशिक्षित व पती आमदार असल्याने त्या सर्व परिस्थितीला कशा सामोरे जाणार, हाच प्रश्‍न आहे. 

भाजप, शिवसेनेतील तीन गट, जनसुराज्य, चंदगड आघाडी, आवाडे गट, स्वाभिमानी संघटना, महाडिक गटाची ताराराणी आघाडी व एक अपक्ष असे मिळून जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले आहे. भाजपला पाठिंबा दिलेले घटक पक्ष व संबंधित पक्षांच्या नेत्यांची तालुक्‍यातील स्थिती याचा अभ्यास केला तर शाहूवाडी, कागल, चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा व हातकणंगले तालुक्‍यांत क्‍लिष्ट परिस्थिती आहे. एकाला गोंजारून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करणेही अवघड होणार आहे. या सहा तालुक्‍यांत एखादा कार्यक्रम जरी घ्यायचा म्हटला किंवा विकासकामाचे उद्‌घाटन, तरीही प्रमुख पाहुणे ठरवण्यापासून ते निमंत्रित कोण, यासाठीही अध्यक्षांची कसोटी लागणार आहे. 

गडहिंग्लज-चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार संध्यादेवी कुपेकर व अप्पी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला; पण तालुक्‍यात ते एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यात शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर यांचीही भर आहे. अशा परिस्थितीत या तालुक्‍यात एखादे काम द्यायचे झाल्यास किंवा कार्यक्रम घ्यायचा झाल्यास चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कुपेकर-महाडिक पै-पाहुणे असले तरी तालुक्‍यात कुपेकर-कुपेकर यांच्यातच टोकाचा संघर्ष आहे. हातकणंगले तालुक्‍यात ऐकायचे कुणाचे, अरुण इंगवलेंचे, आमदार सुजित मिणचेकरांचे, सुरेश हाळवणकरांचे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे की सासरे महादेवराव महाडिक यांचे, हाही प्रश्‍न त्यांच्यासमोर गंभीर असणार आहे. आवाडे-हाळवणकर यांच्यात विस्तवही जात नाही. "जनसुराज्य'चा पराभव केल्याने डॉ. मिणचेकर व श्री. कोरे यांचेही संबंध चांगले नाहीत. अशीच परिस्थिती पन्हाळा, शाहूवाडीत राहणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोरे विरुद्ध महाडिक संघर्ष जुनाच आहे. आज श्री. कोरे भाजपसोबत असले तरी त्यांचा पाठिंबा महाडिक यांच्या सगळ्याच निर्णयांना असेल असेही नाही. 

पूर्वी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांना कर्मचारी बदली, वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी ठरवण्याचे अधिकार होते. आता हे सर्व अधिकार प्रशासनाकडे गेले आहेत. त्यामुळे पाठिंबा दिलेल्या आघाडीतील एखाद्या सदस्याने बदलीसाठी किंवा लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली तर कोणाला प्राधान्य देणार, हा विषय महत्त्वाचा आहे. या वेळी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पच कमी रकमेचा झाला आहे. पूर्वी सदस्य स्वतःच्या हिंमतीवर दहा-पंधरा लाखांचा निधी स्वनिधीतून मतदारसंघात नेत होते. आता चार लाखांचा निधीही मिळणे अवघड आहे. त्यासाठी पुन्हा पाठिंबा दिलेल्या घटक पक्षांचा दबाव असणारच आहे. 

शिक्षक पुरस्कार सर्वाधिक संवेदनशील 
जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार हा सर्वांत संवेदनशील विषय समजला जातो. प्रत्येक तालुक्‍यातून एका शिक्षकाची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. गुणवत्ता हा महत्त्वाचा निकष त्यासाठी असला तरी शिफारस कोणाची आहे, हेही बघितले जाते. त्यातून गेल्याच वेळी एका संशयित आरोपी असलेल्या शिक्षकाला पुरस्कार दिला गेला. प्रत्येक तालुक्‍यातून या पुरस्कारासाठीचा नेत्यांचा दबाव असणारच आहे. त्याचा ताळमेळ घालणेही सौ. महाडिक यांच्यासमोर आव्हान असेल. 

विरोधकांमुळे संघर्ष राहणारच 
सभागृहात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या रूपाने प्रबळ विरोधक आहेत. या विरोधाची चुणूक कालच उमेश आपटे यांनी दाखवली आहे. त्यातही दोन्ही कॉंग्रेसकडे अनुभवी व पुरुष सदस्यांची संख्या जास्त आहे. सत्ताधाऱ्यांकडे महिला सदस्य अधिक आहेत. सभागृहात सौ. महाडिक अध्यक्षा असल्या तरी प्रत्यक्षात माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे म्हणून सदस्य फारच कमी आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेत एखाद्या विषयावरून संघर्ष कायमच पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com