कोल्हापूर : पंचगंगेसाठी सरसावले वैद्यकीय व्यावसायिक

‘केएमए’ वर्षभर राबवणार प्रदूषणमुक्ती कृती कार्यक्रम
पंचगंगेसाठी सरसावले वैद्यकीय व्यावसायिक
पंचगंगेसाठी सरसावले वैद्यकीय व्यावसायिकsakal

कोल्हापूर: पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आता शहर आणि परिसरातील वैद्यकीय संघटनाही सरसावल्या आहेत. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे यंदा शताब्दी वर्ष असून, यानिमित्ताने वर्षभर पंचगंगा प्रदूषणमुक्ती कृती कार्यक्रम राबवणार असल्याचे अध्यक्ष डॉ. गीता पिलाई, सचिव डॉ. ए. बी. पाटील यांनी जाहीर केले. ‘पुन्हा साथ देऊया, चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत शहरातील विविध वैद्यकीय व्यावसायिक संघटना, पदभ्रंमती व गिर्यारोहण संघटना प्रतिनिधी सहभागी झाले. पंचगंगा वाचवा मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार केला.

डॉ. पिलाई, डॉ. पाटील म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराजांचे यंदा स्मृती शताब्दी वर्ष आहे आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यंदा शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम ‘केएमए’ राबवणार आहे. त्यात कोणतेही आजार होवूच नयेत, या भावनेतून काही कृती कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्यात पंचगंगेची प्रदूषणमुक्ती हा प्रमुख अजेंडा राहणार आहे. संघटना अधिकाधिक समाजाभिमुख करताना लोकांचा सहभागही त्यात घेतला जाणार आहे.’

प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके म्हणाले, ‘खरे तर सार्वजनिक आरोग्य विभाग पहिल्यांदा डॉ. जे. पी. नाईक यांनी कोल्हापुरात सुरू केला आणि पुढे देशभर त्याची अंमलबजावणी झाली. हा पॅटर्न नेमका काय होता, याची माहिती उपलब्ध झाली असून. ती लवकरच सर्वांसमोर आणली जाणार आहे. ‘पंचगंगा स्मरे नित्यम’ या उपक्रमातून पंचगंगेचा प्रवाह आणि त्याला जोडणारे विविध प्रवाह असे सर्वेक्षण झाले आहे. नदीत विविध ठिकाणांहून सुमारे ६३८ जल प्रवाह मिसळतात. त्यापैकी १२८ एकट्या शहर आणि परिसरात आहेत. यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.’

बालरोगतज्ज्ञ संघटनेचे डॉ. शिशिर मिरगुंडे म्हणाले, ‘पाण्यामुळे लहान मुलांमध्ये विविध आजार बळावत आहेत. हे आजार होवूच नयेत, यासाठी लसीही उपलब्ध आहेत; पण त्या सरकारी रुग्णालयात उपलब्ध व्हायला हव्यात. मुळात पाणी प्रदूषित होवूच नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर कृतिशील पावलं उचलायला हवीत.’ महाआयुर्वेद रिसर्च मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिकेत पाटील यांनी आयुर्वेदात पाण्याबाबत असलेल्या मार्गदर्शनाविषयी सविस्तर माहिती दिली. आयुर्वेदाने सांगितलेली आदर्श दिनचर्या अंगीकारताना पाण्याचा कमीत कमी वापर आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. रोज पाणी किती प्यावे, याबाबतही काही गैरसमज आहेत. त्याबाबतही सर्व वैद्यक शाखांनी योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.’

डॉ. प्रिया पाटील यांनी पाण्याच्या वापराबाबत घरातील महिलांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनीच जर कमीत कमी पाणी वापरले तर तो घरातच नियम होऊन जाईल, असे सांगितले.

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉ. विकी आरळेकर यांनी मोहिमेत सक्रिय सहभागाची ग्वाही दिली. सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उमेश कदम यांनी काही शहरांत आता फ्लश वॉलवर बंदी जाहीर केली आहे. तो नियम सर्वत्र राबवल्यास पाण्याचा कमीत कमी वापर होईल, असे सांगितले. त्याशिवाय सांडपाणी निर्गतीसाठी परसबागेचा पर्याय प्रभावी असल्याचेही ते म्हणाले. नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अजित लोकरे यांनी प्रदूषित पाण्यामुळे होणाऱ्या विविध विकारांविषयी माहिती दिली. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष प्रकाश कोरे यांनी मोहिमेसाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी मोहिमेची भूमिका सांगितली. पंचगंगा प्रदूषणाचे सध्याचे चित्र विदारक आहे. थेट पाईप लाईनचे पाणी आल्यानंतर आणखी वाईट स्थिती असेल. त्यामुळे आतापासूनच ठोस पावलं उचलताना शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भाग पाडायला हवे. त्यासाठी या मोहिमेतून सरकारवर दबाव आणतानाच लोकसहभागातून कृती कार्यक्रमांवरही भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी मोहिमेची माहिती दिली. यंदा राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष असल्याने राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडी या नावाने निघणाऱ्या जलदिंडीतून नदीकाठच्या गावांत प्रबोधन केले जाईल. २१ एप्रिलला पिरळ (ता. राधानगरी) येथून जलदिंडीला प्रारंभ होईल. २२ एप्रिलला सकाळी सातला शहरातील पंचगंगा घाटावर जलदिंडीचे स्वागत करतानाच स्वच्छता मोहीमही राबवली जाईल. त्यानंतर सायंकाळी इचलकरंजी येथेही असाच उपक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य बातमीदार निवास चौगले यांनी आभार मानले. ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यावेळी उपस्थित होते.

गळतीचे काय करायचे?

गिर्यारोहण संघटनेचे विनोद कांबोज यांनी नळपाणी आणि सांडपाणी योजनांतील गळती केव्हा काढणार, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेने याबाबत अधिक सजगपणे काम करायला हवे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या काही मर्यादा असल्या तरी बीओटी तत्त्वावरही काही गोष्टी करता येतील; पण लोकांच्या जीवाशी खेळ थांबला पाहिजे. त्यासाठी केवळ महापालिकाच नव्हे तर वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने पाण्याचा कमीत कमी वापर आणि सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी योगदान दिलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com