कोल्हापूर : आयटी पार्कसाठी लवकर जागा द्या

पालकमंत्री पाटील यांची महापालिकेला सूचना; निविदेसाठीच्या तयारीवर चर्चा
आयटी पार्क
आयटी पार्कsakal

कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील जागा आयटी पार्कसाठी विकसित करण्यात येणार असून कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महानगरपालिकेला सूचित केले. तसेच आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी तांत्रिक, आर्थिक व कायदेशीर प्रक्रिया करण्यावरही चर्चा झाली.

प्रस्तावित आयटी पार्क संदर्भात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेचे अधिकारी आणि कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज सविस्तर आढावा बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी या पार्कमध्ये चांगल्या आयटी कंपनी कशा येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. २४ जूनला पुढील बैठक घेऊन नियोजित आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे.

आयटी पार्कच्या उभारणीमुळे कोल्हापुरात रोजगार निर्मिती चांगल्या प्रकारे होणार असून स्थानिक युवक-युवतींना लाभ होणार आहे. ज्या कंपन्या कोल्हापूरमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याकरिता पायाभूत सुविधा आणि सर्व सोई उपलब्ध करून देण्याबाबतचीही सूचना करण्यात आली. स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या अनेक तरुणांना रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यात आणि परराज्यात जावे लागते. येथेच रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने लवकर आयटी पार्क उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या वेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर आयटी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रसन्न कुलकर्णी, प्रताप पाटील, विश्वजित देसाई, स्नेहल बियाणी, अधिकारी उपस्थित होते.

शंभरावर कंपन्या इच्छुक

आयटी पार्कसाठी अनेक कंपन्या इच्छुक आहेत. बाहेरील तसेच स्थानिक कंपन्यांचे लक्ष या प्रकल्पाकडे लागले आहे. एकदा ही प्रक्रिया मार्गी लागली, की कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. त्या प्रक्रियेवेळी बाहेरील कंपन्यांबरोबर स्थानिक कंपन्यांना ठराविक भाग देण्याचाही विचार आहे. स्थानिक आयटी असोसिएशनकडून आलेल्या सूचनांनुसार निविदेबाबतच्या सुधारणा करण्यास सांगितले आहे.

निविदेसाठीची तयारी सुरू

आयटी पार्कसाठीची जागा पीपीपी तत्त्‍वावर विकसित करण्यासाठी तसेच निविदा व सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी केपीएमजी ॲडव्हायजरी सर्व्हिसेस लि.ची फायनान्सिअल कन्सल्टंट म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी त्या परिसरातील जागांवर प्रकल्प साकारण्यासाठी पाच पर्याय दिले होते. त्यातील एक पर्याय योग्य असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार निविदेची कागदपत्रे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com