कोल्हापूर : KMTच्या जागेवर अतिक्रमण

विकसित करण्याची केवळ चर्चा, उत्पन्न मिळवण्याची संधी
अतिक्रमण
अतिक्रमणsakal

कोल्हापूर : राजारामपुरीतील माऊली चौकात असलेल्या केएमटीच्या एक एकर जागेपैकीची बहुतांश जागा अतिक्रमणाने गिळंकृत झाली आहे. त्याकडे केएमटीचे लक्षच नसल्याने त्यात भरच पडत आहे. तसेच, गांधीनगर, शिरोली एमआयडीसी, मनोरा हॉटेलसमोर येथे जागा असून, त्याबाबत वेगाने प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. उत्पन्‍न नसल्याने केएमटी तोट्यात आहे अशी नेहमी ओरड केली जात असताना उत्पन्न मिळवण्याची संधी असलेल्या जागेबाबत मात्र प्रशासनाने केवळ विचारच चालवला आहे. त्यामुळे ‘हातातील सोडून पळत्याच्या पाठीशी’ असा प्रकार केएमटीचा सुरू आहे.

नगररचना योजनेंतर्गत माऊली चौकातील आरक्षित जागा २००२ मध्ये केएमटीकडे हस्तांतरीत झाली आहे. यापैकी काही जागेचा आगाऊ ताबा केएमटीकडे आहे. या जागेवर बस टर्मिनस विकसित करण्याचा विचार कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परिवहन समितीच्या अंदाजपत्रकात तसेच बैठकांमध्ये वारंवार चर्चा झाली होती. राजारामपुरीसारख्या व्यापार पेठेत असलेल्या जागेवर टर्मिनस झाल्यास उत्पन्नामध्ये भर पडणार होती. याबाबत अनेकवेळा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याची चर्चा झाली तरी त्याचा टप्पा प्रस्तावापुढे जात नाही. या जागेभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत केएमटीने लक्ष न दिल्याने शिल्लक जागेवरही अतिक्रमणे वाढत आहेत. परिसरातील कचरा या जागेतच टाकला जात आहे.

दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला रिक्षा स्टॉप व अतिक्रमणामुळे जागाच दिसत नाही. आतील बाजूस जनरेटर लावण्याची जागा झाली आहे. त्यांच्यामुळेही जागा व्यापून गेली आहे. शिरोली एमआयडीसीतील जागेचा कब्जा आहे. १४ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागेबाबतचा आराखडा मंजुरीला टाकला आहे. मनोरा हॉटेलसमोरील दीड एकर जागेचा कब्जा घ्यायचा आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. गांधीनगर येथील जागा विकसित करण्याचा प्रयत्न २००० पासून सुरू आहे. २००१ मध्ये परिवहन समिती सभापती सुनील मोदी यांनी बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती.

न्यायालयीन अडथळे निकाली निघाल्यानंतर बेसमेंट धरून चार मजली इमारतीवर संकुल उभारण्याचा प्रस्ताव होता. पाच हजार चौरस फूट बांधकाम सुरू होणार असतानाच कोर्टातून स्थगिती आणली. त्यानंतर त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही.

अतिक्रमणे असतील तर ती दूर करावी लागतील. त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- टीना गवळी,अतिरिक्त परिवहनव्यवस्थापक, केएमटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com