कोल्हापूर जिल्ह्यात आता गाळयुक्त शिवार योजना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

गाळमुक्त शिवार मोहीम लोकसहभागातून व शासकीय यंत्रणामार्फत राबविली जाणार आहे. लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गाळ उपसण्यासाठी इच्छुक व्यक्‍ती, व्यक्तींचा समूह, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांना तहसीलदारांकडे अर्ज करावा लागणार आहे.

कोल्हापूर : राज्यात सध्या जलयुक्त शिवार योजनेच्या पार्श्‍वभूमीवर आता गाळयुक्त शिवार योजना राबविली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारपासून (ता. 5) 15 जूनपर्यंत पाझर तलाव, गावतलाव, साठवण तलाव, लघुपाटबंधारे तलाव, माती नाला बांध, सिमेंट नाला बंधाऱ्यांतील गाळ काढून जलस्त्रोत मुक्त केला जात आहे. काढलेला गाळ लोकसहभागाच्या माध्यमातून शेतामध्ये टाकला जात आहे. याला लोकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

सुभेदार म्हणाले, "जलयुक्त शिवार योजनेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. याच पार्श्‍वभूमीवर पाझर तलाव, साठवण तलाव, लघुपाटबंधारे, माती नाला बांध, सिमेंट नाला बांधातील साठलेला गाळ काढून जलस्त्रोत गाळ मुक्त केले जात आहेत. काढलेला गाळ लोकसहभागाच्या माध्यमातून शेतात टाकण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने 5 ते 15 जूनपर्यंत गाळ काढला जाईल. याकामी ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, साखर कारखान्यासह इतर सहकारी संस्था, विविध उद्योगसमूह, बांधकाम व्यावसायिक, क्रेडाई यासारख्या संस्थांनी पुढे यावे.''

गाळमुक्त शिवार मोहीम लोकसहभागातून व शासकीय यंत्रणामार्फत राबविली जाणार आहे. लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गाळ उपसण्यासाठी इच्छुक व्यक्‍ती, व्यक्तींचा समूह, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांना तहसीलदारांकडे अर्ज करावा लागणार आहे. त्याची प्रत संबंधित साठवण तलावाचे देखभाल यंत्रणांचे उपअभियंता यांना द्यावयाची आहे. तहसीलदारांनी तीन दिवसांत अर्जाची छाननी करून या ठिकाणी वाळू उपसा, तत्सम अनियमितता होणार नाही याची खातरजमा करावयाची आहे. साठवण तलावाच्या मूळ रचनेला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने त्याची देखभाल करणाऱ्या यंत्रणेच्या उपअभियंता व शाखा अभियंता यांनी रेषा आखून देण्याचे आवाहनही सुभेदार यांनी केले आहे.

या वेळी जिल्हा परिषदेमार्फत गाव तलाव, पाझर तलावामधील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले. मागील वर्षी कळंबा तलावातील गाळ काढण्यासाठी जशी उत्स्फूर्तता दाखवली होती तशीच यावर्षीही दाखवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.
मुख्य उद्देश
- तलावाची साठवण क्षमता वाढविणे
- पाण्याचे पुनर्भरण करणे
- जमिनी सुपीकता वाढविणे

Web Title: kolhpur to start galyukt shivar yojana