कोणार्कच्या गाण्याची अधुरी कहाणी...!

कोणार्कच्या गाण्याची अधुरी कहाणी...!

कोल्हापूर - 'सैय्याऽऽऽऽ तू जो छू ले प्यार से... आराम से मर जाउं...आ जा चंदा बाहों में तुझमें ही गुम हो जाउं मैऽऽऽ तेरे नाम से खो जाउं...' कोणार्कच्या आवाजात त्याच्याच मित्रानं रेकॉर्ड केलेल्या या गाण्यानं हजारो नेटिझन्सना भुरळ घातली. त्याचं गाणंच मुळात भल्याभल्यांना भुरळ घालणारं होतं. हा पोरगा तरणाबांड. दिसायला पैलवानासारखा; पण इतका नम्र, की एखाद-दुसऱ्या भेटीतच मैत्रीचे सूर जुळायचे. ऐन उमेदीत आज त्यानं अनपेक्षित एक्‍झिट घेतली आणि केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे, तर त्यानं निर्माण केलेल्या साऱ्या गोतावळ्याला जबरदस्त धक्का बसला.

कोणार्क शा. कृ. पंत वालावलकर शाळेचा माजी विद्यार्थी. विवेकानंद कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच येथील सांगीतिक विश्‍वात त्याची ओळख निर्माण होऊ लागली. अनेक सुगम संगीत, भजन स्पर्धांतून त्याच्या आवाजाची भुरळ साऱ्यांनाच पडू लागली. पुढे शिवाजी विद्यापीठात संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेताना तो स्टुडंट कौन्सिलचा सचिवही झाला. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसाठी तो पुढे सरसावला.

याच दरम्यान अनेक युवा महोत्सवांतूनही त्याने बक्षिसांची लयलूट केली. हळूहळू शहरातील वाद्यवृंदातूनही तो गायला लागला. ग्रुप कुठलाही असो, कार्यक्रम करायचा म्हटलं, की त्याची संमती ठरलेली. गाणं चित्रपटातलं असो किंवा एखादं भजन, तो तितक्‍याच तन्मयतेने गायचा. पंढरपूरच्या कानड्या विठ्ठलाचा तो भक्त. गेली काही वर्षे उत्तरेश्‍वर पेठेच्या पंढरपूर पायी वारीत तो सहभागी व्हायचा.

यंदाच्या पायी वारीतही तो त्याच्या मित्रांसह भेटला. पहिल्या दिवशी शिरोलीपर्यंत आला आणि दिंडीसाठी काही तरी देण्याची इच्छा व्यक्त केली. लगेचच दुसऱ्या दिवशी निमशिरगाव फाट्याला तो सर्वांसाठी नाश्‍ता घेऊन पोचला आणि पुन्हा घरी परतला. आषाढी एकादशीदिवशी पंढरपुरात त्याच्या गाण्याचा कार्यक्रमही रंगला.

पंढरपुरातून परतल्यानंतर पुन्हा त्याच्या मैफली सजू लागल्या. रविवारी तर कऱ्हाडला एक मैफल करून तो परतला आणि पित्ताचा त्रास होत असल्याचे सांगू लागला. प्रवास आणि जागरणामुळे झाले असेल, याच भावनेतून त्याकडे त्याने फारसे लक्ष दिले नाही. साेमवारी (ता. सहा) दुपारी मात्र त्याला रक्‍ताची उलटी झाली आणि हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर ब्लड कॅन्सरचे निदान झाले. तत्काळ पुण्याला हलवण्याचा सल्ला वैद्यकीय सूत्रांनी दिला आणि घरच्यांनी पुण्याला हलवले. मात्र, आज भागवत एकादशीदिवशीच त्याची प्राणज्योत मालवली.

अनपेक्षित धक्का..
काल रात्री दहापासून व्हॉटस्‌-ॲप ग्रुपवर कोणार्कबाबतचे मेसेजेस फिरू लागले; परंतु तो बरा होईल, अशीच साऱ्यांची धारणा. आजची सकाळ उजाडली. आपापल्या फोनवरचे अपडेटस्‌ सारी मंडळी बघू लागली आणि ‘आपला कोणार्क गेला’ या मेसेजने साऱ्यांनाच धक्का बसला. एकमेकांना पुन्हा फोनाफोनी सुरू झाली. घडलेली घटना ‘कन्फर्म’ झाली आणि साऱ्या मंडळींनी कोणार्कच्या कदमवाडी येथील घराकडे धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com