कोकणातील वाळू आता कोल्हापुरात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

उपशावर बंदी घातल्याचा परिणाम - दर भडकले, बांधकामे रखडली
कोल्हापूर - बांधकामासाठी काळी वाळू नव्हे तर लाल-पिवळीच घ्या, अशी स्थिती आज कोल्हापुरात झाली आहे. यांत्रिक पद्धतीने उपशावर बंदी घातल्यामुळे वाळूचा तुटवडा जाणवत आहे. पर्याय म्हणून चिपळूण, संगमेश्‍वर अशा कोकण भागातून वाळू कोल्हापुरात आणली जात आहे. परिणामी दरही भडकले आहेत व बांधकामे रखडली आहेत.

उपशावर बंदी घातल्याचा परिणाम - दर भडकले, बांधकामे रखडली
कोल्हापूर - बांधकामासाठी काळी वाळू नव्हे तर लाल-पिवळीच घ्या, अशी स्थिती आज कोल्हापुरात झाली आहे. यांत्रिक पद्धतीने उपशावर बंदी घातल्यामुळे वाळूचा तुटवडा जाणवत आहे. पर्याय म्हणून चिपळूण, संगमेश्‍वर अशा कोकण भागातून वाळू कोल्हापुरात आणली जात आहे. परिणामी दरही भडकले आहेत व बांधकामे रखडली आहेत.

हरित लवादाने यांत्रिक पद्धतीने वाळू उपशाला बंदी घातली आहे. त्यामुळे ऐन हंगामातच वाळू उपसा बंद करावा लागला आहे. उन्हाळ्यात बांधकाम उरकून घेण्यासाठी सर्वांची धडपड असते. याचवेळी वाळू उपसा बंद झाल्यामुळे डेपोत ठेवलेल्या वाळूलाही आता सोन्याचा भाव आला आहे.

विक्रेतेही कोकणातून आणलेली लाल-पिवळी वाळू ‘मिक्‍स’ करून ग्राहकांना देत आहेत. काही ठिकाणी पर्याय नसल्यामुळे पिवळी वाळू सुद्धा काळ्या वाळूत ‘मिक्‍स’ करून वापरत आहेत. 

कोकणातील वाळू कोल्हापुरात फार चालत नाही.शहरात सुमारे अडीचशे ट्रक वाळू वाहतुकीच्या व्यवसायात आहेत. यापैकी ७० टक्के ट्रक बंद ठेवले आहेत. तर काहींनी चिपळूण, संगमेश्‍वर आदी भागातून वाळू वाहतूक सुरू ठेवली आहे. घाटातून वाहतूक होत असल्यामुळे त्यांना प्रत्येक ‘ट्रीप’ नंतर ट्रक थेट गॅरेजमध्ये घेवून जावा लागत आहे. त्याचाही खर्च विक्रेते ग्राहकांच्या माथी मारत आहेत. 

मार्केट यार्ड येथील वाळू मार्केटमध्ये गर्दी कमी झाली आहे. काही जण केवळ चहा पिण्यासाठी सकाळ-संध्याकाळी कट्ट्यावर हजेरी लावत आहेत. 
हरित लवादाकडे २१ मेस पुढील सुनावणी होत आहे. सुनावणीत काय निर्णय होईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. उन्हाळा हंगामातील अवघ्या पंधरा दिवसाचा कालावधी वाळू व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांकडे राहिला आहे. याच कालावधीतील उलाढाल महत्वाची ठरते. मात्र याच कालावधीत वाळू बंद असल्यामुळे अनेकांनी चढ्या दराने वाळू विकून हात धुऊन घेतले आहेत. तर काहींनी कोणतीही ‘रिस्क’ न घेता व्यवसाय बंद ठेवून मार्केटच्या उलाढालीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

जालन्यातून थेट कोल्हापुरात...
वाळू चांगली पाहिजे, असेही म्हणणारे काही ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी एका व्यावसायिकाने दहा चाकी ट्रक थेट सुमारे सहाशे किलोमीटरवर असलेल्या जालना येथून आणले आहेत. एक ट्रक वाळूसाठी त्यांनी तब्बल लाख रुपयांचा दर काढला आहे.

Web Title: konkan sand in kolhapur