महिला बचत गटांचे होणार एकत्रीकरण

महिला बचत गटांचे होणार एकत्रीकरण

कोरेगाव - जिल्हा परिषदेच्या सातारारोड गटातील महिलांचे बचतगट ‘सेमिइन्सेंटिव्ह’ होणार आहेत. या गटातील २२ गावांतील महिला बचतगटांना आता दारिद्य्ररेषेखालील बचतगटांप्रमाणेच शासकीय अनुदानासह विविध योजनांचा फायदा मिळेल. त्यामुळे सातारारोड व कुमठे गणातील दारिद्य्ररेषेवरील गरीब व सामान्य महिलांच्या (पीपल ऑफ पॉवर्टी) सबलीकरणाला बचतगटांच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली आहे.

दारिद्य्ररेषेवर असलेल्यांपैकी अनेक कुटुंबांचे जीवनमान हलाखीचे असल्याची स्थिती अद्यापही कायम आहे. अशा कुटुंबातील महिलांच्या सबलीकरणासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘सेमिइन्सेंटिव्ह’ बचतगटांची संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यानुसार, कोरेगाव पंचायत समितीच्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सातारारोड गटाची निवड केली आहे. त्यात सातारारोड गणातील सातारारोडसह खेड, तडवळे (संमत कोरेगाव), चांदवडी, बोबडेवाडी, आसगाव, जळगाव, भाकरवाडी आणि कुमठे गणातील कुमठेसह आसरे, वडाचीवाडी, चिमणगाव, बोधेवाडी, बोरजाईवाडी, सांगवी, आझादपूर, भोसे, सिद्धार्थनगर, भंडारमाची, चंचळी, अनभुलेवाडी, घाडगेवाडी ही गावे समाविष्ट आहेत. सातारारोड गणासाठी समन्वयक म्हणून रेखा गायकवाड, तर कुमठे गणाच्या समन्वयक म्हणून सोनाली धर्माधिकारी यांची नेमणूक झाली आहे. एका गटामध्ये किमान दहा व कमाल २० महिला याप्रमाणे बचतगटाची रचना राहणार आहे. बचतगटाने सुरवातीला अंतर्गत बचत करणे अपेक्षित असून, तीन महिन्यांनंतर संबंधित गटास  बिनव्याजी व बिनपरतीचे १५ हजारांचे खेळते भांडवल पुरविले जाणार आहे. त्यानंतर बचतगटास राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत ५० हजारांपर्यंतचे कर्ज पुरवले जाईल. त्यावरील सात टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असलेले व्याज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत भरले जाणार आहे. त्यानंतर बचतगटाच्या बचतीवर, कार्यक्षमतेवर आणि परतफेडीच्या क्षमतेवर दहा लाखांपर्यंत पुढील कर्ज दिले जाईल. त्याचा लाभ मात्र नियमित बचत व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या गटांनाच मिळेल. या योजनेमध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन कौटुंबिक उत्कर्ष साधावा, असे आवाहन सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुखे, गटविकास अधिकारी खर्डे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com