'कृष्णा'च्या आठ माजी संचालकांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

बनावट कर्जप्रकरणात कारवाई; तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

बनावट कर्जप्रकरणात कारवाई; तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
कऱ्हाड - तोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्जप्रकरणी शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्षांपाठोपाठ आठ माजी संचालकांना आज अटक झाली. त्यातील तिघांना पोलिस, तर पाच जणांना न्यायालयीन कोठडीत मिळाली. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक झाली होती. त्यानंतर आज झालेल्या अचानक अटक सत्राने खळबळ उडाली आहे. संभाजीराव रामंचद्र जगताप (वय 73, रा. कोडोली, ता. कऱ्हाड), सर्जेराव रघुनाथ लोकरे (52, रा. येरवळे), अशोक मारुती जगताप (56, रा. वडगाव हवेली), उदयसिंह प्रतापराव शिंदे (50, रा. बोरगाव, ता. वाळवा), बाळासाहेब दामोदर निकम (69, रा. शेरे), चंद्रकांत विठ्ठल भुसारी (70, रा. टेंभू) महेंद्र ज्ञानू मोहिते (56, रा. वाटेगाव, ता. वाळवा) वसंत सीताराम पाटील (68, रा. नेर्ले, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यातील चंद्रकांत भुसारी, उदय शिंदे व महेंद्र मोहिते यांना तीन दिवासांची पोलिस कोठडी मिळाली. कारखान्याची सत्ता अविनाश मोहिते यांच्याकडे होती. सन 2014-15 च्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या 784 वाहनधारकांना न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी सात लाख रुपये अशा एकूण 58 कोटींच्या परतफेड करण्याच्या नोटिसा बॅंक ऑफ इंडियाकडून पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकीच यशवंत पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनाही नोटीस बजविण्यात आली होती. त्यांनी कारखान्याकडे 2013- 14 मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्‍टर- ट्रॉलीचे आरसीबुक, टीसी बुक, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड अशी कागदपत्रांच्या झेरॉक्‍स कॉफी दिल्या होत्या; पण करारानुसार ठरलेली उचल न दिल्याने वाहतूकदाराने तोडणी वाहतुकीसाठी वाहन लावलेच नाही, तरीही शेतकऱ्याच्या नावे सात लाख रुपयांचे कर्ज उचलले गेल्याची बाब नोटिशीनंतर त्यांना कळाली. कर्ज वसुलीच्या नोटिसा मिळाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव उत्तमराव पाटील, तत्कालीन अधिकारी व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने खोट्या सह्या करून शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अटकसत्र सुरू आहे.

बॅंकेचे काही अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात
या प्रकरणात काही बॅंकेच्या अधिकाऱ्यांची नावेही आहेत. त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्यांना अटक झालेली नाही. संबंधितांकडे कसून चौकशी सुरू होती. त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार होती. चौकशीच्या फेऱ्यातही ते अडकले होते.

Web Title: krishna sugar factory 8 ex. director arrested