बार्शीत पणीबाणी, ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल 

tap
tap

बार्शी (सोलापूर) : उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असताना वीजपुरवठा व लीकेज बाबतीत नगरपालिकेचे नियोजन ढासळ्याने बार्शीकरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. सुज्ञ नागरिकांनी उदात्त हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा स्वीकारला आहे. तरीही मुबलक पाणीपुरवठा असताना केवळ नियोजन अभावी नागरिकांचे मागील एक महिन्यापासून हाल होत आहेत. 

गेल्या महिनाभरापासून बार्शी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अधून-मधून तीन-चार दिवस नळाला पाणी येत नाही. मात्र पालिकेच्या कोणत्याच अधिकारी व पदाधिकारी गांभीर्याने या गोष्टी कडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. थेट जनतेतून निवडून आलेले कायदे तज्ञ नागराध्याक्ष असिफ तांबोळी याना अद्याप नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर वचक बसवून नियोजन करणे शक्य होत नसल्याचे दिसते. 

पाणीपुरवठा बाबतीत नागरिकांचे आणखी हाल होऊ नये यासाठी शहराचा पाणीपुरवठा पालिकेने तात्काळ पुर्ववत करुन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी होऊ लागली आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या , मोठी औद्यागिक वसाहत, शाळा, महाविद्यालये व हॉस्पिटल्स ची संख्या मोठ्या प्रमाणात असलेले बार्शी शहर असून शहरात अ दर्जाची पालिका आहे. बार्शी शहरासाठी उजनी धरणातील कंदर येथील पंपहाऊसमधून पाणीपुरवठा केला जातो. शिवाय परांडा तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्प याठिकाणाहून देखील पाणी येत आहे. यामध्ये उजनी धरणातून १ कोटी तीस लाख लिटर तर चांदनीमधून तीस लाख लिटर पाणी दररोज येते. 

मागील कांही वर्षापुर्वी शहराची पाणीसाठवण क्षमता ही कमी होती. मात्र मागील कांही वर्षात सुजल निर्मल योजनेमधून शहराच्या विविध भागात नवीन पाण्याच्या उंच टाक्या बांधण्यात आल्यामुळे साठवण क्षमता देखील वाढलेली आहे. तसेच सध्या उजनी व चांदणी या दोन्ही प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा असताना शहरातील नागरिकांना दररोज पाणी येत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ गेल्या महिन्यापासून आठवड्यातून सलग- तीन-तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत़ याबरोबरच अनेक भागात अनेक वॉलओपनर पाणी कमी-जास्त प्रमाणात सोडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत़ नागरिकांचे आणखी हाल होऊ नयेत यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे.

नगरपालिकेने देखभाल दुरूस्तीसाठी ठेका दिलेला आहे. मात्र पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदार यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने बार्शीकरांचे हाल होत आहेत. 
- नागेश अक्कलकोटे, विरोधी पक्षनेते, बा. न. पा.

गेल्या कांही दिवसापासून बार्शी-कुर्डूवाडी रोडवर विविध ठिकाणी पाईपलाईनला सातत्याने होत असलेले लिकेज व महावितरणकधून पूर्ण क्षमतेने होत नसलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे ही टंचाई निर्माण झाली होती. सलग तीन दिवस दिवसरात्र हे लिकेजचे काम पूर्ण केले आहे. नियमित पाणीपुरवठा सुरू होईल. 
- अजय होनखांबे, जलदाय अभियंता बा. न. पा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com