राज्यातील फडणवीस सरकार जाऊ दे! - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

कोल्हापूर - शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा मंगळवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला अभिवादन केल्यानंतर यात्रेतील नेत्यांनी आंबाबाई दर्शन घेतले. "राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे आणि राज्यातील हे फडणवीस सरकार जाऊ दे,' असे साकडे देवीला घातल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

संघर्ष यात्रेसाठी सोमवारी (ता. 24) रात्री अजित पवार यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसच्या इतर नेत्यांचे आगमन झाले होते. सकाळी आठ वाजता या सर्वांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. आमदार सतेज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जन्मस्थळाबाहेर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला. कसबा बावडा येथून ही संघर्ष यात्रा भवानी मंडपातील अंबाबाई मंदिरात आली. देवीकडे काय मागितले, या प्रश्‍नावर "राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत आहे, त्यातून आत्महत्या वाढलेल्या आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सुबुद्धी फडणवीस सरकारला दे व राज्यातील हे सरकार जाऊ दे,' असे साकडे देवीला घातल्याचे पवार यांनी सांगितले.

या यात्रेत कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुनील केदार, वसंत चव्हाण, अमर काळे, रामहरी रूनवार, मोहन कदम, "राष्ट्रवादी'चे माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुवरल तटकरे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.

नेत्यांमधील मतभेदाचे दर्शन
कोल्हापूर जिल्ह्यातील "राष्ट्रवादी'चे खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात मतभेद आहेत. त्याची झलक या यात्रेच्या निमित्तानेही पाहायला मिळाली. दोन्ही कॉंग्रेसचे सर्व नेते एका बाजूला व खासदार महाडिक एका बाजूला असे दिसले. देवीकडे काय मागितले, असे मुश्रीफ यांनी पवार यांना विचारल्यानंतर "जिल्ह्यातील विखुरलेल्या या नेत्यांची चेहरे एकत्र येऊ देत,' अशी साद घातल्याचा टोला पवार यांनी या वेळी लगावला.

बाळूमामालाही साकडे
कोल्हापुरातून संघर्ष यात्रा कागलमार्गे आदमापूर येथील धनगर समाजाचे देवस्थान असलेल्या बाळूमामा मंदिरात आली. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे वचन सरकारने अडीच वर्षांपूर्वी दिले होते; पण अजून ते पूर्ण केले नाही, त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे पवार या वेळी म्हणाले. "या समाजाची ही फसवणूक असून या समाजाला आरक्षण देण्यासाठी शक्ती बाळूमामाने सरकारला द्यावी,' असेही साकडे घातल्याचे ते म्हणाले.