मागेल त्या गावाला टॅंकर द्या  - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

""वडूज, मायणी, औंध, खातवळ, पुसेसावळी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या थकीत बिलांसंदर्भात तातडीने मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल.'' 
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री 

वडूज - जलयुक्त शिवार योजनेतील बंधाऱ्यांची कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. टंचाईस्थिती गांभीर्याने घेऊन प्रस्ताव येतील, त्या गावांना तातडीने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करा, असेही त्यांनी म्हटले आहे. 

वडूज (ता. खटाव) येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ""टंचाईच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवून वेळ काढू धोरण घेऊ नये. ग्रामसेवक, तलाठ्यांनी जागरूक राहावे. टॅंकरचे प्रस्ताव आल्यानंतर तातडीने मंजूर करावेत. बंधारे, तलावातील गाळ काढण्यासंदर्भात यांत्रिकी विभागास तातडीने सूचना कराव्यात. पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी उरमोडीचे पाणी पूर्ण क्षमतेने देण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल.'' 

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उरमोडी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबरोबरच वडूज पाणी योजनेच्या वीजबिलाचा विषय उपस्थित केला. जिहे- कठापूर योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केल्यास पन्नास टक्के टंचाई कमी होईल, असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. जलयुक्त शिवारसाठी अभियंत्यांची संख्या व इतर सामग्रीची उपलब्धता वाढविण्याची मागणी त्यांनी केली. प्रदीप विधाते यांनी नेरचे पाणी येरळा नदीत सोडल्यास सोळा गावांतील टॅंकरचा प्रश्‍न मिटेल, असे सांगितले. अपुऱ्या कामाच्या मुद्‌द्‌यावरून भोसरेचे सरपंच महादेव जाधव यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला. ग्रामसेवक श्री. मदने यांच्या असहकार्यामुळे कुरोली येथील जलयुक्त शिवार योजनेचे काम बारगळल्याचा आरोप रेश्‍मा तानवडे यांनी केला. 

गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. सभापती संदीप मांडवे यांनी आभार मानले. बैठकीस प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सीमा होळकर, उपसभापती कैलास घाडगे, सुरेखा माने, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, नंदकुमार मोरे, प्रा. अर्जुनराव खाडे, सी. एम. पाटील, मानसिंगराव माळवे, शिवाजीराव सर्वगोड, विकल्पशेठ शहा, सभापती संदीप मांडवे, प्रा. अर्जुनराव खाडे, ऍड. विलासराव इंगळे, धनंजय चव्हाण, काकासाहेब मोरे, सुनीता कदम, सोनाली पोळ, सुनीता कचरे आदी उपस्थित होते.