व्याजाचा तोटा भरण्यासाठी प्रयत्न करू - देशमुख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

कोल्हापूर - जिल्हा बॅंकांना पीककर्ज देताना होणारा दीड ते दोन टक्के व्याजाचा तोटा राज्य सरकारने भरावे यासाठी प्रयत्न करू, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी कोल्हापुरात सांगितले. कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा बॅंकांची 88 अन्वये चौकशी होऊन पुढील कारवाई न्यायालयात प्रलंबित असेल तर अशा प्रकरणात चांगला वकील देऊन हा विषय मार्गी लावला जाईल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यातील सहकाराचा आढावा घेण्याच्या निमित्ताने देशमुख आज कोल्हापुरात आले होते. ते म्हणाले, 'सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. विकास सोसायट्या व शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारात काम करण्याची गरज आहे. विकास सोसायट्यांनी मार्च अखेर किमान एक तरी व्यवसाय सुरू करावा यासाठी तालुका निबंधकांना सूचना केल्या आहेत. यासाठी प्रत्येक शेतकरी हा विकास सोसायटीचा सभासद झाला पाहिजे हे उद्दिष्ट दिले आहे. यातून ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासह तरुणांचे शहराकडे येणारे लोंढे गावातच थांबवण्याचा प्रयत्न आहे.''

नोटबंदीमुळे त्रास पण...
जुन्या 500 व 1000 च्या चलनी नोटा रद्द केल्याने सामान्य माणसाला त्रास झाला हे मान्य आहे. हा त्रास ही लोक सहन करतात त्यांचे आभार मानले पाहिजेत. अजून दहा दिवसांनी परिस्थिती पूर्वपदावर येऊन एक वैभवशाली अर्थक्रांतील सुरवात होईल. यापुढे कॅशलेस व्यवहाराची सवय लोकांना लावली पाहिजे, असे देशमुख या वेळी म्हणाले.

'भूविकास'चा प्रश्‍न सोडवणार
भूविकास बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी थकीत आहेत. यासाठी बॅंकेच्या मालमत्ता विकून हे पैसे देण्याचा प्रयत्न राहील. दिवाळी सणासाठी या कर्मचाऱ्यांना पगार दिला. मालमत्ता विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, लवकरच याच्या निविदा प्रसिद्ध करून उर्वरित देणी दिली जातील, असे देशमुख यांनी सांगितले.