घरोघरी जाऊन मतदार पडताळणी, नोंदणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सातारा - राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी अचूक व्हावी व मतदारांना मतदानविषयक चांगल्या सुविधा देता याव्यात, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याच्या मोहिमेस प्रारंभ झाला आहे. ही मोहीम २० जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका या येणाऱ्या २०१९ मध्ये होणार आहेत. त्यामुळे दिनांक एक जानेवारी २०१९ या दिनांकास वयाची १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या सर्व मतदारांची नोंदणी होण्यासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सिंघल यांनी नमूद केले. सातारा जिल्ह्यात दोन हजार ९३३ मतदार यादी भाग आहेत. प्रत्येक भागाकरिता एक या प्रमाणे दोन हजार ९३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत केंद्राचे नाव बदलणे, केंद्राचे विभाजन करणे व ठिकाण बदलणे याबाबतची माहिती गोळा करणार आहेत. या उपक्रमांतर्गत मतदार यादीच्या पडताळणीत मतदारांच्या नावाचा समावेश करणे, नावे वगळणे, तपशिलात बदल करणे, विधानसभा मतदारसंघांतर्गत बदल करणे यासाठी आवश्‍यक असलेले अर्ज घरोघरी भेटी देणाऱ्या बीएलओकडे तसेच संबंधित तहसील कार्यालयात आणि www.nvsp.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नाव असल्यास ते वगळण्यासाठी, मृत झालेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी अर्ज करावेत. 

हे सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधाही BLONET हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सिंघल यांनी स्पष्ट केले.

Web Title: loksabha vidhansabha election voter registration