तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी

तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी

काँग्रेस, राष्ट्रवादीतच चुरस; सातारा राजधानी आघाडीचाही पर्याय

लोणंद - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, रासप व आरपीआय आदी सर्वच पक्षांकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्षांतील नेते व पदाधिकारी आपल्या पक्षांकडून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या तगड्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या प्रयत्नात आहेत. तशा उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांकडून घेतला जात आहे. 

खंडाळा तालुक्‍यात लोणंद व खंडाळा या दोन मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊनही तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे पूर्वी इतकेच तीन गट राहिले आहेत. नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे खेड बुद्रक, भादे व शिरवळ हे तीन गट झाले. खेड बुद्रक, बावडा, भादे, नायगाव, शिरवळ व पळशी हे सहा गण झाले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम
गेल्या वेळी जिल्हा परिषदेच्या लोणंद गटातून एक व पंचायत समितीच्या खेड बुद्रुक, पळशी व भादे गणातून तीन जागा मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने पंचायत समितीची सत्ता काबीज करून पाच वर्षे उपभोगली. त्यातच आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे पारडे तालुक्‍यात नेहमीच जड राहिले आहे. लोणंद व खंडाळा नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुका आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढल्याने या दोन्ही ठिकाणची सत्ता राष्ट्रवादीने काबीज केली. तालुक्‍यातील लोणंद बाजार समिती, जिल्हा बॅंक, विविध ग्रामपंचायती व विकास सोसायट्यांमध्येही राष्ट्रवादीने मोठे यश खेचून आणल्याने तालुक्‍यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व कायम आहे. या पक्षाला गट व गणांतील इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे पक्षांतर्गत बंडाळीचा मोठा धोका आहे.
 
काँग्रेस कार्यकर्ते घायाळ
गेल्या वेळी जिल्हा परिषदेच्या शिरवळ व खंडाळा गटातून दोन व पंचायत समितीच्या लोणंद गणातून एक जागा मिळवून तालुक्‍यात सर्वाधिक मते मिळवलेल्या काँग्रेसला मात्र सत्तेपासून दूरच राहावे लागले आहे. या पक्षाचे नेते व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी तालुक्‍याकडे पाठ फिरवल्याने येथील कार्यकर्ता सक्षम नेतृत्वाविना घायाळ आहे. कोठे जावे आणि कोठे थांबावे हेच कोणाला नेमकेपणाने उमजत नाही. अनेक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचा आश्रय घेताना दिसत आहेत. मदन भोसले व शंकरराव गाढवे यांच्या अथक प्रयत्नांमुळे खंडाळ्यात साखर कारखाना सुरू होऊन पहिला गळीत हंगाम धुमधडाक्‍यात सुरू आहे. मात्र, त्याचे मार्केटिंग करण्यात काँग्रेस कमी पडली, की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पक्षांतही जुन्या- नव्या कार्यकर्त्यांच्यात पक्षांतर्गत कहल सुरू आहे. कोण कोणाच्या जवळ आहे. यावरूनच येथील उमेदवाऱ्या निश्‍चित होतील, असे मानले जात आहे. 

शिवसेनेचा स्वबळाचा नारा
गेल्या वेळी शिरवळ गणातून पंचायत समितीची एक जागा जिंकून खाते उघडलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा करत गेली पाच वर्षे उपसभापतिपदाच्या माध्यमातून सत्तेत वाटा मिळवलेल्या शिवसेनेने यावेळी स्वबळाचा नारा देत सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढवून भगवा फडकवण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे यांनी खेड बुद्रुक गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, गट व गणातील पक्षाचे उमेदवार अद्यापही निश्‍चित नाहीत. सर्व जागांवर ताकदीचे उमेदवार देण्याबरोबर पक्षांतर्गतचा संघर्ष मिटविण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आवाहनही शिवसेना नेतृत्वापुढे आहे. 

अन्य पक्षांतही हालचाली
देशात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या व लोणंद नगरपंचायतीच्या माध्यमातून दोन नगरसेवक प्रथमच निवडून आलेल्या आणि त्यानंतर खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या भाजपला मात्र या निवडणुकीत सर्व जागांवर पक्षाचे उमेदवार देण्याबरोबर तालुक्‍यातून एक तरी जागा जिंकून आणून पक्षाचा आब राखण्याचे मोठे आव्हान असेल. तालुक्‍यात रासपची ताकद नगन्य असली, तरी पक्ष पातळीवरून स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. आरपीआयची भूमिक अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.

‘सातारा राजधानी’ व काँग्रेस एकत्र? 
जिल्हा परिषद, पंचायत समितीची ही निवडणूक मदन भोसले, शंकरराव गाढवे, ॲड. बाळासाहेब बागवान यांच्या नेतृत्वाखाली आणि उदयनराजे भोसले यांच्या सातारा राजधानी विकास आघाडीच्या साथीने एकदिलाने लढून फिनिक्‍स फरारी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावून पुन्हा एकदा तालुक्‍यावर वर्चस्व सिद्ध करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. तशा हालचाली सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com