बोगस नळ कनेक्‍शनमुळे कोट्यवधींचा फटका

बोगस नळ कनेक्‍शनमुळे कोट्यवधींचा फटका

जत - शहरात अधिकृत नळ कनेक्‍शनपेक्षा बोगस कनेक्‍शन संख्या अधिक असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर पाणी पडत आहे. या मिळणाऱ्या उत्पन्नातून वीजबिल व कर्मचाऱ्यांचे पगार भागवणेदेखील मुश्‍किल होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग तोट्यात आहे. हा विभाग चालविण्यासाठी इतर विभागातला निधीवर भार पडत आहे. पाणीपट्टी वसूलसाठी कायदेशीर कारवाईचा बगडा उगारणारे पालिका प्रशासन बोगस नळ कनेक्‍शनवर कारवाई का करीत नाही? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

मुख्याधिकारी पल्लवी पाटील पालिकेच्या उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून पाणी व घरपट्टी न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बगडा उगारला आहे. पाणीपट्टी वसुलीचे हे धोरण पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र शहरात अधिकृत नळ कनेक्‍शनपेक्षा बोगस कनेक्‍शनची संख्या अधिक आहे. सध्या शहरात फक्‍त ३ हजार ४०४ अधिकृत कनेक्‍शन आहेत. शहरात १२० सार्वजनिक स्टॅंड पोस्ट आहेत. शासकीय वसतिगृह व पंचायत समिती वगळता एकाही कनेक्‍शनला मीटर नाही. शहराला बिरनाळ तलाव व यलम्मा पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा होतो. बिरनाळ तलावातून ३० लाख लिटर, तर यलम्मा पाणीपुरवठा योजनेतून १३ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. याचे दरमहा ६ लाख रुपये वीज बिल येते. पाणीपुरवठा विभागाकडे कायस्वरूपी ७ व हंगामी ३ असे दहा कर्मचारी आहेत. सध्या पाणी पुरवठ्याचे उत्पन्न पाहता वीज बिल व कर्मचाऱ्यांचे पगार भागविणे देखिल मुश्‍किल होत आहे. या सर्वाचा भार इतर विभागतल्या निधीवर पडतो. 

मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पाणीपट्टी वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविली आहे. दररोज स्पिकरवरून नागरिकांना आवाहन केले जाते. याशिवाय कायदेशीर बगडा उचलण्यात आला आहे. ही मोहीम स्वागतार्ह असली तरी बोगस कनेक्‍शनचे काय? बोगस कनेक्‍शनमुळे पालिकेच्या बुडणाऱ्या उत्पन्नाला जबाबदार कोण? हा प्रश्‍न पडतो. 

पदाधिकाऱ्यांमुळेच बोगस कनेक्‍शन
ग्रामपंचायत असताना दिलेल्या बोगस कनेक्‍शनचा अद्याप शोध नाही. अशातच पालिकेचे पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे पालिका प्रशासनाला कळू न देता कनेक्‍शन दिले जातात. यात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारीही सामील आहेत. अशा धोरणामुळे अधिकृत कनेक्‍शनधारकांवर अन्याय होत आहे. मात्र, पालिका प्रशासनाला देणे घेणे नाही. अधिकृत कनेक्‍शनधारकांना वेठीस धरून पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबविली जात आहे. 

पालिका प्रशासनास नाही गांभीर्य
अधिकृत कनेक्‍शनांची संख्या पाहता होणारा पाणीपुरवठा जास्त आहे. त्यामुळे बोगस नळकनेक्‍शन असल्याचे स्पष्ट होते. अधिकृतपेक्षा बोगस कनेक्‍शनची संख्या जास्त आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नावरच पाणी पडत असल्याचे चित्र आहे. मात्र, याचे गांभीर्य पालिका प्रशासनाला असल्याचे दिसून येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com