सातारा जिल्ह्यात बारावीच्या निकालात माण तालुक्‍याची बाजी 

सिद्धार्थ लाटकर 
बुधवार, 30 मे 2018

​जिल्ह्यातील माण तालुक्‍याचा सर्वाधिक 93.39 टक्के इतका सर्वांत कमी पाटण तालुक्‍याचा 87.27 टक्के इतका लागला आहे.

सातारा -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर झाला असून सातारा जिल्ह्याचा 91.14 टक्के निकाल लागला आहे.

जिल्ह्यातील माण तालुक्‍याचा सर्वाधिक 93.39 टक्के इतका सर्वांत कमी पाटण तालुक्‍याचा 87.27 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेस सातारा जिल्ह्यातील 38 हजार 051 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 34 हजार 679 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींची (95.90 टक्के) उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा (87.25 टक्के) जादा आहे. इयत्ता बारावीचा निकाल आज (बुधवार) ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजता जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा निकाल 91 टक्के लागला आहे. या विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल 91.50 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठतर सांगली जिल्ह्याचा 90.12 टक्के लागला आहे. हा निकाल पाहण्यासाठी शहरातील सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी होती. काही जण मोबाईलवर निकाल पाहत होते. बहुतांश महाविद्यालयाच्या बाहेर ही बारावीचे विद्यार्थी एकमेकांना मिठ्या मारुन शुभेच्छा देत होते. पालक वर्ग देखील मुलांना कंदी पेढे भरवून आनंद व्यक्त करीत होते. 

सातारा जिल्हा शाखानिहाय निकाल -
विज्ञान शाखा - 97.58 टक्के, कला शाखा - 79.18 टक्के, वाणिज्य शाखा - 95.38 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम - 90.86 टक्के. 

तालुका निहाय निकाल -
माण - 93.39, खंडाळा - 93.13, सातारा - 93.34, वाई - 91.92, जावली - 89.54, कऱ्हाड - 89.83, खटाव - 90.30, कोरेगाव - 90.96, महाबळेश्‍वर - 92.08, फलटण - 90.22, पाटण - 87.27. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Maan talukas result of HSC was the highest in satara district