मदन‘बाण’ कोणाच्या भात्यात?

Udayanraje-Bhosale-and-Madan Bhosale
Udayanraje-Bhosale-and-Madan Bhosale

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाक्‌संघर्षामुळे जिल्ह्यातील राजकीय तर्कवितर्कांच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत ऊत आलेला आहे. यातच थकीत ऊस बिल प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आता मदन भोसलेंचेही नाव त्यात सहभागी झाले आहे.

लोकसभेला भक्कम उमेदवार म्हणून भाजप त्यांना पुढे करणार, अशा या चर्चा आहेत. शिवाय उदयनराजेंना पर्याय म्हणून ते राष्ट्रवादीच्याही रडारवर आहेत. जिल्ह्याच्या राजकीय गर्भात काय अंकुरणार, हे निवडणुकीवेळीच समजणार असले, तरी या चर्चांमुळे राजकीय जाणकारांना पटाची मांडणी करायला नवा मुद्दा मिळाला आहे, हे नक्की.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी संघटित बहिष्कार टाकला. अगदी पारावर बसून राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्यांपासून प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेच्या जवळपास असणाऱ्या सर्वांना ठोकताळे मांडण्यासाठी हा मोठा मुद्दा मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी उदयनराजेंना उमेदवारी देणार का, दिली तर आमदार काय करतील, शिवेंद्रसिंहराजेंची काय भूमिका असणार, यावर तर्कांचा किस निघत होता. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली, तर उदयनराजे काय करतील, त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत, भाजप त्यांना तिकीट देईल का, ते दिले तर उदयनराजेंच्या समोर काय अडचणी असतील, भाजपच्या तिकिटाने त्यांना काय फायदा होईल, भाजपला किती मतदारसंघांत फायदा होईल, राष्ट्रवादी किती विधानसभा मतदारसंघांत अडचणीत येऊ शकते, याचीही गणिते मांडली जात होती.

त्यातच उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंविरुद्धचे शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले. त्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण व साताऱ्यात आव्हान देण्याच्या उदयनराजेंच्या कृतीचा हातभार लागला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणूक जिल्ह्यातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उदयनराजेंसमोर कोण, असा प्रश्‍नही या चर्चांमध्ये पुढे येत होता. त्यावरही बरेच ठोकताळे मांडले जात होते. उमेदवार कऱ्हाडमधीलच असेल अशी एक चर्चा वारंवार होत होती. त्यात श्रीनिवास पाटील यांचेही नाव समोर यायचे. मात्र, सक्षम पर्यायाचे स्वरूप त्याला येत नव्हते. रामराजेंचा पर्याय त्यांच्या मतदारसंघाबाहेरच्या जिल्ह्यात चालेल का, यावर कपाळावर प्रश्‍नार्थी आट्या यायच्या. उदयनराजे यांच्या भोवतीच फिरणाऱ्या या चर्चा होत्या. आता त्यात दुसरे नाव आले आहे.

किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल देण्यासाठी जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले. या पार्श्‍वभूमीवर कर्तव्य म्हणून स्थानिक आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. काही सभासदांनी पत्रक काढले. त्यामुळे बरेच दिवस राजकीय चर्चांपासून दूर असलेले मदन भोसले केंद्रस्थानी आले आहेत. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अनेकदा भेटी झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीतून त्यांना खासदारकीला लढण्याची ऑफर आल्याची चर्चा सुरू आहेच; आता त्यात भाजपच्या डावपेचाचा मुद्दा पुढे आला आहे. 

या चर्चांमध्ये पटतील असेच मुद्दे मांडले जातात. कारखाना संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक व राजकीय पाठबळाची आवश्‍यकता आहे. त्या नाड्या सध्या भाजपच्या हातात आहेत. कारखान्याच्या बाबतीत मदत करून भाजप त्यांच्याशी जवळीक साधत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मदन भोसलेंना उतरविण्याची चाचपणी भाजपकडून सुरू असल्याचे बोलले जाते. मदन भोसले व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या भेटींचा दाखला त्यासाठी दिला जातो आहे. 

या संभाव्य उमेदवारीला ग्राह्य मानत राजकीय पटलावरील आखणीच्या, उलथापालथीच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मदन भोसले भाजपकडून उतरलेच तर, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, आमदारांची नाराजी आणि मदन भोसलेंसारखा उमेदवार समोर आल्यास उदयनराजेंची उमेदवारी डावलली जाऊ शकते. अशा परिस्थितीत उदयनराजे काय भूमिका घेणार, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. निवडणुका जवळ आल्या की राजकीय चर्चा या होतच असतात. सर्वच चर्चा प्रत्यक्षात येतात असे नाही आणि कोणत्याच येत नाहीत असेही नाही. मात्र, सामान्यापासून राजकीय कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या या चर्चा अनेक धोरणांची मांडणी करणाऱ्या ठरत असतात. जिल्ह्याच्या राजकीय गर्भात काय अंकुरणार आहे, हे निवडणुकीच्या वेळीच समोर येईल. तोपर्यंत प्रसूत कळांवरच अंदाज बांधले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com