महाबळेश्‍वर टोलनाक्‍यावर शिवसेना आमदारासह कुटुंबीयांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

महाबळेश्वर - महाबळेश्वर येथील टोलनाक्‍यावर चेंबूरचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते तसेच त्यांचा मुलगा व सुनेला टोलनाका कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांत दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

टोल कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा अनुभव आज चेंबूर (मुंबई) येथील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांना आला. महाबळेश्वर सहलीवर आलेल्या कातेंची गाडी टोलनाक्‍यावर आल्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा कर्मचारी पुढे आला व त्याने गाडीच्या बॉनेटवर हात आपटत टोलची मागणी केली. काते यांच्या चालकाने त्यास गाडीत आमदार आहेत, गाडीवर हात आपटू नकोस, असे सांगितले; परंतु तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. "आमदार असो किंवा आणखी कोण, टोल द्या अन्‌ पुढे जा', असे म्हणत तो कर्मचारी काते बसलेल्या बाजूच्या खिडकीच्या काचेवर हात मारू लागला. कातेंनी काच खाली केल्याचे लक्षात न आल्याने त्याचा हात कातेंना लागला.

दरम्यान, कातेंचा मुलगा गणेश व चालक गाडीतून खाली उतरले आणि बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर तेथील पंधरा ते वीस कर्मचारी धावून आले. यातील काहींनी काते यांच्या मुलाला व चालकाला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांनी कातेंच्या सुनेलाही धक्काबुक्की केली. नंतर पर्यटकांनी काते व त्यांच्या कुटुंबाला टोलकर्मचाऱ्यांच्या तावडीतून सोडविले.