हातकणंगलेत महाडिकांचे कार्यकर्ते कुंपणावरच

हातकणंगलेत महाडिकांचे कार्यकर्ते कुंपणावरच

कोल्हापूर - भाजप, जनसुराज्य व ताराराणी, युवक क्रांती अशी आघाडी झाली असली तरी हातकणंगले तालुक्‍यात मतदारसंघानुसार महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका बदलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपमध्ये महाडिक आहेत ; मात्र महाडिक गटात भाजप किती रुजला हा संशोधनाचा विषय आहे. तसेच नेत्यांचा स्पष्ट आदेश नसल्यामुळे कोणती भूमिका घ्यावी, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. स्थानिक आघाडीबरोबरच मिळते जुळते घेतले. हातकणंगले तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे ११ मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजपला सहा, जनसुराज्यला तीन व युवक क्रांती आघाडीस दोन असे जागा वाटप झाले आहे. तालुक्‍यात महाडिक यांना मानणाऱ्या गटाची ताकद लक्षणीय आहे; मात्र त्याच ठिकाणी जनसुराज्यची ताकद प्रबळ आहे. त्यामुळे जागा वाटपात रुकडी, घुणकी, कुंभोज, भादोले या जागा भाजपला मिळाव्यात, असा महाडिक यांचा आग्रह होता; मात्र या जागा मिळवण्यात जनसुराज्य यशस्वी झाले. तर रुकडी व पट्टणकडोलीची जागा धैर्यशील माने यांच्या युवक क्रांती आघाडीकडे आली. रुकडी मतदारसंघात महाडिक यांचे नेतृत्वाखाली हातकणंगले पंचायत समितीचे सभापती राजेश पाटील काम करतात; मात्र त्यांनी युवक क्रांती आघाडीबरोबर जाण्यास नकार दिला आहे. राजेश पाटील यांनी स्वाभिमानीतून पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

जिल्हा परिषदेमधील काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य व महाडिक गटाचे नेते शहाजी पाटील यांच्या सुनेला पारगाव पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे.  असे  असले तरी महाडिक गटाचे कार्यकर्ते अद्याप शांतच आहेत. तालुक्‍यातील सर्वच मतदारसंघात महाडिक यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षवेधी आहे, परंतु त्या कार्यकर्त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले तरी हे कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्तच असल्याचे चित्र आहे. महाडिक गटाचे कार्यकर्ते मतदारसंघानुसार सोयीची भूमिका घेतील अशी चर्चा आहे. वर्षा अखेरीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या गटाची मदत होणार, कोणाची सोबत घ्यावी लागणार या स्थानिक संदर्भावरच महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदारसंघानुसार कार्यकर्त्यांची भूमिका बदलल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

विकास मानेंचा पैरा फेडणार का
२००७ च्या निवडणुकीत भादोले मतदारसंघ खुला होता. त्यावेळी अंबपचे विकास माने काँग्रेसकडून इच्छुक होते; मात्र नेत्यांच्या आदेशाने त्यांनी माघार घेतली. यामुळे काँग्रेसमधून अमल महाडिक यांचा विजय सुकर झाला. यानंतर २०१२ च्या निवडणुकीत माने यांनी काँग्रेसला टाटा करत, जनसुराज्यमध्ये प्रवेश केला व घुणकीतून उमेदवारी मिळवली. २००७ च्या निवडणुकीत परतफेड म्हणून महाडिक गट मदत करेल, असा विश्‍वास माने यांना होता; मात्र महाडिक यांनी शहाजी पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसली. यामुळे माने गटाने महाडिक व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. आता विकास माने यांच्या भावजय मनीषा विजयसिंह माने यांना भादोले मतदारसंघातून जनसुराज्यने उमेदवारी दिली आहे. जनसुराज्य व भाजप आघाडी आहेच. त्यामुळे महाडिक गट माने गटाचा पैरा फेडणार की पुन्हा विरोधात भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com