कोट्यवधी खर्चाच्या दर्शन मंडपाचा घाट कोणासाठी?

कोट्यवधी खर्चाच्या दर्शन मंडपाचा घाट कोणासाठी?

महालक्ष्मी मंदिरात भक्तांसाठीच्या सुविधांऐवजी सुशोभीकरणावरच अधिक भर 

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात भक्तांच्या सुविधांऐवजी केवळ सुशोभिकरणाचा घाट घातला जात आहे. दर्शन मंडपावर होणारा तब्बल १० कोटींचा खर्च नेमका कोणासाठी? असा प्रश्‍न यानिमित्ताने पुढे येत आहे.

नवरात्रोत्सवात घालण्यात येणाऱ्या जागेवर चांगले दर्शन मंडप अगदी कमी किमतीत उभे करता येणे शक्‍य आहे. चांगल्या स्वच्छतागृहाबरोबर काही मूलभूत सुविधांची गरज आहे. असे असताना निव्वळ विद्युत रोषणाई आणि सुशोभिकरणाकडेच सध्या लक्ष दिले जात आहे. 

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा बनविल्यानंतर पहिल्यापासूनच दर्शन मंडप हा वादाचा मुद्दा राहिला आहे. भक्तांच्या सोयींसाठी दर्शन रांगेची व्यवस्था कायमस्वरूपी असली पाहिजे, या विषयी दुमत असण्याचे कारण नाही.

तथापि दर्शन मंडपाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे. फरासखाना येथून दर्शन रांग असल्याचा मुद्दा नव्यानेच पुढे येऊ लागला आहे. फरासखाना इमारत ही हेरिटेज आहे. तेथे दुरुस्ती आणि अन्य विषय येणारच. त्याऐवजी सरलष्कर भवन येथे नवरात्रोत्सवाप्रमाणे मंडप कायमस्वरूपी उभारल्यास हा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. नवरात्रोत्सवात कोल्हापुरात रोज लाख ते दीड लाख भाविक येतात. यासाठी सध्या घातला जाणारा मंडप पुरेसा असतो. 

नवरात्रोत्सवानंतर दिवाळी, मे महिना, डिसेंबर, सलग शासकीय सुट्या अशा कालावधीत भक्तांची गर्दी वाढते, परंतु ती नवरात्रोत्सवाइतकी नसते.

तथापि नवरात्रोत्सवातील मंडपाप्रमाणेच कायमचा दर्शन मंडप उभारल्यास तेथून भक्तांना दर्शनासाठी जाणे, पोलिसांना सुरक्षा व्यवस्था आखणी करणे, देवस्थान समितीस नियोजन करणे अधिक सोयीचे होईल.  काल झालेल्या बैठकीत विद्युत रोषणाईवर चर्चा झाली. यापूर्वी माजी आमदार सुरेश साळोखे यांच्या फंडातून मंदिर आवारात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठीही लाखो रुपये खर्च झाले. आता त्या दिव्यांची वायरही शिल्लक राहिलेली नाही. लाखो रुपये पाण्यात गेले. विद्युत रोषणाई करताना याचा विचार केला जाणार आहे का? केवळ सुशोभिकरणावर भर देण्यापेक्षा महिला, लहान मुले, वृद्ध यांच्यासाठी चांगली स्वच्छतागृहे उभारण्याची गरज आहे. सुशोभिकरणाचे नियोजन करणाऱ्यांनी  गर्दीच्या कालावधीत करवीर नगर वाचन मंदिर, कॉमर्स कॉलेज या परिसरात फिरून पाहावे म्हणजे आपण भक्तांना नेमक्‍या काय सुविधा देतोय हे लक्षात येईल. सध्या असलेले स्वच्छतागृह अपुरे आहे आणि मंदिर आवारातील स्वच्छतागृह फोडल्याने बंद आहे. त्यामुळे भक्तांची मोठी कुचंबणा होत आहे. याकडे प्रशासनातील ही मंडळी लक्ष देणार आहेत का, असा प्रश्‍न या निमित्ताने पुढे येत आहे.

दर्शन मंडपाचे गणित 
नवरात्रोत्सवात सरलष्कर भवनसमोर ३५ बाय २०० म्हणजे ७००० स्क्‍वेअर फुटांचा दर्शन रांग मंडप घालण्यात येतो. या मंडपामध्ये साधारण एकाच वेळी ९ ते १० हजार भक्त थांबतात. त्यातही महिला भक्तांची संख्या अधिक असते. या दर्शन मंडपासाठी लोखंडी बॅरिकेडिंग, लाकडी बांबू व अन्य तात्पुरत्या मंडपासाठी लागणारे साहित्य वापरले जाते. त्यातच पंखे आणि एलईडीची सोय केलेली असते. अशाच पद्धतीने कायमचा लोखंडी व वरती पत्रा आणि अन्य सुविधा असलेला दर्शन मंडप घालण्याचे नियोजन केल्यास कायमचे लोखंडी स्ट्रक्‍चर, लोखंडी बॅरिकेडिंग, पत्रे, पंखे, एलईडी टीव्ही, दिवे, पावसाचे पाणी जाण्याची सोय अशी सगळी व्यवस्था केली तर एक कोटी किंवा त्यातूनही कमी किमतीत होऊ शकते. डोळ्यांवर पट्टी लावलेल्यांकडून यावर विचारच मांडला जात नाही. दर्शन मंडप कुठे हवा याची जनमत चाचणी घेतल्यास देवीचे भक्त यालाच पसंती देतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com