'महिलाराज'मध्ये पतींच्या उचापतीच अधिक उपद्रवी!

'महिलाराज'मध्ये पतींच्या उचापतीच अधिक उपद्रवी!

राजकारणासह सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या चमकदार कामगिरीने पुरुषांच्या बरोबरीने समाजाच्या विकासात पुढाकार घेत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. ज्या क्षेत्रात महिला जातील तिथे त्या आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवतील, अशा विश्‍वासही समाजात निर्माण होऊ लागला. त्यांना संधी देण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू झाले. महिला राजकारणात आल्या तर भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे प्रकार कमी होतील, असेही म्हटले जाते. महिलांबाबतचा विश्‍वास अनेकांनी सार्थ करून दाखविलाही; पण वाईतील घटनेमुळे मात्र सर्वांचीच बोटे तोंडात गेली. लाचखोरीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असताना लाच स्वीकारणाऱ्यांच्या अटकेच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विविध सरकारी यंत्रणांतील अधिकारी- कर्मचारी पकडले जात आहेत. अशातच डॉक्‍टर महिला नगराध्यक्ष तिच्या पतीसह लाच स्वीकारताना सापडते, ही बाब गंभीर लाजीरवाणी आहे.

वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती सुधीर शिंदे यांना शुक्रवारी लाचलुचपत विभागाने 14 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. त्यांची जामिनावर मुक्तता झाली. गुन्हा सिद्ध व्हायचा आहे, तरीही जी घटना समोर आली, ती धक्कादायकच आहे. वाई पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत लोकांनी प्रतिभा शिंदे यांना अवघ्या एका मताने विजयी करीत नगराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. वाईत बहुमत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडे अशी विचित्र अवस्था झाली. सत्ता स्थापित होऊन आठ महिन्यांचा कालावधी झाला. सत्तेतील विचित्र समीकरणामुळे समन्वयाचा अभाव होता. विकासकामे आणि लोकांच्या कामाला गती मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. नगराध्यक्षपदी महिला असल्याने हळूहळू कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात भलतेच घडले. लोकांची सार्वजनिक कामे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने करतात, हे उघड झाले. डॉ. संतोष पोळ याच्या खून सत्राच्या प्रकरणाने काही महिन्यांपूर्वी सांस्कृतिक वाई हादरली होती. त्यानंतर डॉक्‍टर असणाऱ्या उच्चविद्यविभूषित महिलेने वाईलाच नव्हे, तर साऱ्या समाजाला धक्का दिला. तिचा पतीही शिक्षण क्षेत्रात पर्यवेक्षक पदावर काम करतो. शिवाय जिल्ह्यात पाळेमुळे रोवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला रुजण्याआधीच तडा गेला.

राजकारणातून विकास साधला जावा, अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असते. सार्वजनिक सोयी- सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच रोजचे जगणे सुसह्य व्हावे, एवढी किमान अपेक्षा असते. लोकांना सुविधाही मिळत नाहीत आणि त्यांच्या अडचणीही दूर होत नाहीत. ज्यांच्यावर विश्‍वास दाखविला ते अवसानघातकी निघाले, तर हतबल होण्याखेरीज हातात काहीच उरत नाही. राजकारणात महिला आल्या तर बदल घडेल, असा विश्‍वासही व्यक्त होत होता. समाजातील 50 टक्के असणाऱ्या महिला लोकांसाठी तळमळीने काम करतील, या अपेक्षेने राजकारण सुरू झाले. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सार्वजनिक संस्थांमधून महिला लोकप्रतिनिधींची संख्या लक्षणीय दिसू लागली. अनेक सदस्या कामकाज जाणून घेऊन उत्साहाने विकासाच्या प्रक्रियेत आल्या. महिलांच्या पतींच्या उचापती हा विषय चर्चेत रंगू लागला. सर्वच महिला सदस्यांचे पती हस्तक्षेप करतात, असेही नाही. मात्र, काही ठिकाणी सभागृहात महिला सदस्याऐवजी पतीच सभेसाठी बसल्याच्या घटना घडल्या. महिलांनी स्वतःची निर्णयक्षमता वाढवावी, अशी ही संधी होती; पण त्यांना प्रामाणिकपणे काम करू देण्यात पतीराजांचा अडथळा अनेक ठिकाणी दिसत होता.

कोणती कामे व्हावीत, ती कशी व्हावी या साऱ्या गोष्टींपासून राजकारणात तिने कसे वागावे, कोणाशी बोलावे अशा साऱ्या गोष्टींपर्यंत पतीराजांचा हस्तक्षेप वाढला. या संस्थांच्या कामात टक्केवारीचा रोग शिरला. या टक्केवारीसाठी महिलांचा पदर धरून पतीराजच कारभार बघू लागले, असेही अनेक ठिकाणी घडू लागले. अखेर पतीराजांच्या उचापतींना कायद्याने चाप बसविण्याचे प्रयत्न झाले, तरीही त्यांचा उपद्‌व्याप सुरूच राहतो, हेही स्पष्ट होते. आज अनेक ठिकाणच्या सत्तेत महिला पदाधिकारी आहेत. कुठे पती तर कुठे पक्षांचे नेते- कार्यकर्ते यांच्या सल्ल्यानेच कामकाज चालविण्याचा प्रयत्न होतो. तिलाही विचार आहेत, मन आहे, बुद्धी आहे, याचा विसर सर्वांनाच पडतो. तिला तिच्या क्षमतेनुसार निर्णय घेण्याची संधी दिली आहे, हेच अनेकांना खटकत असते. त्यातून तिला दडपण्याचाच प्रयत्न होतो. घरापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत अशा प्रकाराला तोंड देतच तिची वाटचाल सुरू आहे.

वाईच्या प्रकरणात नेमके काय झाले, हे नंतर स्पष्ट होईल. या घटनेतील गुन्हा सिद्ध झाला, तर कठोर कारवाईही व्हावी. पक्षीय राजकारणचा खेळही एका बाजूला सुरू असतो. त्या राजकारणातील डावपेचही महिलांना त्रासदायक ठरत असतात. पक्ष कोणताही असला तरी सगळीकडे सारखेच अशी स्थिती आहे. राजकारणाचा गाडा सुरळीत चालायचा असेल, तर महिलांना स्वतंत्र बाण्याने काम करू देण्याच्या संधीला प्रोत्साहन दिले पाहिजे. तिला प्रामाणिकपणे तिचे काम करू देण्याची जबाबदारी तिच्या कुटुंबीयांसह पक्षाचे नेते- कार्यकर्ते यांनी पेलली पाहिजे. समाजाच्या विकासाला चांगले वळण द्यायचे असेल, तर हे करणे क्रमप्राप्त आहे. महिलांनीही खंबीरपणे आपले काम योग्य पद्धतीने करून आपल्या प्रामाणिक कामाने आपल्याला सिद्ध केले पाहिजे, तरच लोकांमध्ये असणारा विश्‍वास अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. अन्यथा महिला राजकारणात आल्या तरी काही फरक पडत नाही. "पहिले पाढे पंचावन्न'ची प्रक्रिया सुरू राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com