प्रभाकर देशमुख प्रशासनातच रमणार

प्रभाकर देशमुख प्रशासनातच रमणार

राजकीय भूमिकेची प्रतीक्षाच; सातारा व माढा मतदारसंघांत होत राहणार चर्चा

मलवडी - ज्यांचा एखादा कटाक्ष वा कृतीसुद्धा बातमीचा विषय ठरतो, त्या शरद पवार यांनी रामराजेंच्या बरोबरीने साताऱ्याची जबाबदारी प्रभाकर देशमुख यांना देत असल्याचे जाहीर केले अन्‌ माण विधानसभा मतदारसंघासह सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांत विविध चर्चांना उधाण आले. मात्र, श्री. देशमुख लगेच राजकारणात सक्रिय होण्याची शक्‍यता दिसत नाही. त्यांच्यावर प्रशासकीय जबाबदारीच येण्याची शक्‍यता आहे.

देशमुख राजकारणात येतीलही, पण आत्ताच नव्हे हे नक्की. तोपर्यंत देशमुख यांच्या राजकीय भूमिकेच्या अनुषंगाने माणसह सातारा जिल्ह्यात व माढा मतदारसंघात राजकीय गप्पा होत राहतील. माण गौरव समिती आयोजित कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचा गौरव समारंभ पुण्यात रंगला. प्रमुख पक्षांची नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणांहून आलेला जनसमुदाय पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरंतर हे श्री. देशमुख यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत केलेल्या कार्याचे संचित होते. या कार्यक्रमात श्री. देशमुख यांच्यावर रायगड संवर्धनाची जबाबदारी देणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले तर जलसंधारण विभागाची धुरा देशमुख यांच्याकडे देणार असल्याचे सूतोवाच महादेव जानकर व विजय शिवतारे या मंत्र्यांनी केले. देशमुख यांना निरोप देत नसून त्यांचे स्वागत करत असल्याचे रामराजे यांनी सांगितले. शरद पवार यांनी तर या सर्वांवर कडी केली. त्यांनी ‘सातारकरांनो लक्षात ठेवा मी काय म्हणतो,’ असे सांगून देशमुख यांच्या राजकारण प्रवेशाचा थेट संकेत दिला. यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट बरेच काही सांगून गेला.

राजकारणाच्या चर्चेमुळे देशमुख सांगत असलेला त्यांचा सामाजिक कार्याचा ओढा झाकोळून गेला. 

श्री. देशमुख यांना जवळून अनुभवणारे लोक नक्कीच सांगतील की, ते लगेच राजकारणात येण्याची शक्‍यता नाही. जलसंधारण विभागात त्यांना अजून खूप काम करायचे आहे. जलसंधारण खात्याच्या सचिवपदावरून देशमुख गेल्यापासून तब्बल पाच जण या पदावर येऊन गेले. जलयुक्त शिवार योजना विस्कळित झाली आहे. देशमुख सचिव असतानाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे या योजनेला गती देण्यासाठी राज्य शासनाला देशमुख यांच्यासारख्या अभ्यासू अधिकाऱ्याची गरज आहे. तसे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे देशमुख पुन्हा एकदा ‘जलयुक्त शिवार’ची धुरा सांभाळताना दिसले तर नवल नको. कोकण आयुक्तपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी व माजी कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी रायगड विकासाचा आराखडा तयार केला. रायगड संवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात यश मिळविले. पण, रायगड संवर्धनासाठी अल्प कालावधी मिळाल्याची खंत त्यांच्या मनात आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिवनेरी संवर्धनाचा चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे रायगड संवर्धनाची जबाबदारी शासन त्यांना देण्याची शक्‍यता आहे. ही परिस्थिती पाहता देशमुख लगेच राजकारणात सक्रिय होण्याची शक्‍यता दिसत नाही. देशमुख राजकारणात येतीलही, पण आत्ताच येणार नाहीत हे नक्की. तोपर्यंत देशमुख यांच्या राजकीय भूमिकेच्या अनुषंगाने माणसह सातारा जिल्ह्यात व माढा मतदारसंघात राजकीय गप्पा होत राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com