"सोलापूर शहर उत्तर'वर अनेक इच्छुकांचा  डोळा 

solapur
solapur

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे संकेत महापौर शोभा बनशेट्टी यांनी पुन्हा दिले आहेत. त्यामुळे या मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा पालकमंत्री विजय देशमुख यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते मात्र पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करण्याच्या मानसिकतेत आहेत. 

पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी आहे, असा पुनरुच्चार महापौर शोभा बनशेट्टी यांनी एका गणेशोत्सव मंडळाने आयोजिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आणि पालकमंत्री विजय देशमुख यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या. महापौर किंवा नगरसेवक असताना खासदार आणि आमदार झाल्याची अनेक उदाहरणे सोलापूर महापालिकेत आहेत. त्याचाच कित्ता गिरवण्याचा संकल्प बनशेट्टी यांनी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. "सकाळ संवाद'मध्ये महापौरांनी पहिल्यांदा गौप्यस्फोट केला होता. 

बनशेट्टी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या, तर सभागृहनेते संजय कोळी पालकमंत्री देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत. सध्या दोन मंत्र्यांमधील वादाच्या घटना, आरोप-प्रत्यारोप चव्हाट्यावर येत नसले तरी, त्यांच्यातील शीतयुद्ध अद्याप संपलेले नाही. बनशेट्टी यांचा पुनरुच्चार हा त्याचाच एक भाग आहे. पालकमंत्र्यांवर मतदार नाराज आहेत, असे वातावरण तयार करण्याचे काम भाजपमधीलच काहीजणांनी सुरू केले आहे. त्याचवेळी भाजपचे उमेदवार म्हणून पालकमंत्री विजयी होतीलच, शिवाय त्यांना वैयक्तिक मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर कुणीही टिकाव धरणार नाही, असे प्रत्त्युतर पालकमंत्री समर्थकानी  तयार ठेवले आहे. 

भाजपमध्ये सुरू झालेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसह एमआयएम, बसप आणि आता भारिपमध्ये इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांना "शहर उत्तर'ची ऑफर आहे. मात्र, त्यांचा कल अद्याप स्पष्ट झालेला नाही. भाजपकडून नागेश वल्याळ, कॉंग्रेसकडून माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांच्यासह शहराध्यक्ष प्रकाश वाले, बसपकडून गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीकडून माजी महापौर मनोहर सपाटे इच्छुक आहेत. भारिप-एमआयएम आघाडीचा उमेदवार असणार आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत कोण बाजी मारतो हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. 

खासदार-आमदार झालेले नगरसेवक 
नगरसेवक असताना खासदार-आमदार झालेल्यांची संख्या मोठी आहे. धर्मण्णा सादूल महापौर असताना खासदार झाले. नरसय्या आडम, भीमराव रोणे, विश्‍वनाथ चाकोते, लिंगराज वल्याळ व शिवशरण पाटील नगरसेवक असताना आमदार झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com