शहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला 

शहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला 

कोल्हापूर - बुवाबाजीला थारा नको, घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको, विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ नको, की अनाठायी खर्च नको, असा वज्रनिर्धार करत मराठा आचारसंहिता आचरणात आणण्यासाठी मराठा समाजाने आज एकजुटीचा एल्गार केला. मराठा स्वराज्य भवन उभारण्याचा संकल्पही येथे करण्यात आला. मराठा संस्कृती टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन मराठा समाजाचा विकास घडवावा, असे आवाहन करण्यात आले. निमित्त होते अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित मराठा आमसभेचे. मार्केट यार्डमधील राजर्षी शाहू सांस्कृतिक भवनमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

मराठा क्रांती मूक महामोर्चानंतर मराठा समाज एकत्र आला. मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतर मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत चर्चा सुरू राहिली. त्याचबरोबर समाजातील अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलली गेली. समाजाच्या विकासासाठी नियोजनबद्ध चौकट आखण्याकरिता मराठा आचारसंहितेची गरज स्पष्ट झाली. मराठा आरक्षण मिळण्यासाठी पुढच्या टप्प्यातील लढाई व मराठा स्वराज्य भवन साकारण्यासाठीचे मुद्देही पुढे आले. हे तिन्ही प्रश्‍न तडीस लागण्यासाठी आमसभेत त्यावर उहापोह करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आज आमसभेसाठी जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांतील मराठा समाजातील बांधव शाहू सांस्कृतिक भवनात जमा झाले. मराठा आचारसंहितेचे तंतोतंत पालन करत समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार, असा निर्धारच त्यांनी केला. 

मराठा आचारसंहिता अशी : 
* छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन. (वास्तुशांती, लग्नकार्य समारंभ) 
* मराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे व समाजावर संस्कार करणे. 
* समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामीनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी) यांची मनोभावे पूजा व्हावी. या दैवतांमध्ये अनावश्‍यक वाढ होऊ नये. बुवाबाजीला थारा नको. घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको. 
* शहाण्णव कुळी समाजाची संभ्रमावस्था आहे. यात विभागणी होऊ नये. सर्व एकच आहोत, ही भावना वाढीस लावावी. यासाठी संशोधकांची मदत घ्यावी. 
* विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्त्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एच.आय.व्ही.च्या तपासणीला हरकत नाही. 
* विवाहातील बडेजाव व अट्टहास - 1) मुहूर्तमेढ - आंब्याच्या फांदीऐवजी कुंडीतील आंब्याचे कलमी रोप वापरावे. 2) आहेर - खोट्या प्रतिष्ठेपायी 100 ते 500 व्यक्तींपर्यंत आहेर करण्याची प्रथा बंद करावी, असा एकमुखी निर्णय. 3) काव्याक्षतांची नासाडी थांबवावी. 4) लग्न कार्यातील वधू-वरांना उचलण्याचा अट्टहास, काव्याक्षता फेकाफेकी व वरातीत डॉल्बी व दारूच्या वापराने तंटे होतात. त्यामुळे वरातीसारख्या पद्धती बंद व्हाव्यात. 5) अनाठायी खर्च टाळावा. 6) हुंडा व सोन्याच्या मोहापायी कर्जबाजारी होऊन होणारे अनर्थ टाळूया. 7) सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे. 
* सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे. 
* व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे. 1) बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे. (पाच ते सात दिवस). 2) एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जित करावी व बाकी रक्षाकुंडात विसर्जित करावी किंवा शेतीमध्ये विसर्जन करून प्रिय व्यक्तीच्या स्मृती जागृत ठेवाव्यात. 3) रक्षा विसर्जनानंतर नैवेद्य रूपाने होणारी अन्नाची नासाडी टाळावी. घरच्या व्यक्तींनीच मृत व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ ठेवण्यास हरकत नाही. 4) कालानुरूप वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन सकाळी नऊ ते दहाच्या आत रक्षा विसर्जन होण्यासाठी दक्ष राहावे. कारण व्यावसायिक व नोकरदार यांना सोयीचे होईल. 6) दिवसकार्याप्रसंगी भेटवस्तू (भांडी) वाटप बंद करावे. 7) दिवस कार्यानंतर पै-पाहुण्यांकडून नव्याने येऊ घातलेली मटण भोजनाची प्रथा पूर्णपणे बंद करावी. 8) वास्तुशास्त्र-घर बांधणीमध्ये हवा, प्रकाश या पुरताच हा विषय मर्यादित ठेवावा. यामध्ये थोतांड करणाऱ्यांना आळा घालून जरब बसविणे. वास्तुशांती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने करावी. 9) प्रत्येक गोष्टीची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा करावी. 10) मुलगा-मुलगी भेद नको. दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणे. 11) गावच्या जत्रा, माही पूर्वीप्रमाणे आप्तांच्या पुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भोजनावेळी बंदी व्हाव्यात. यामध्ये दारूचा वापर थांबवावा. 

मराठा भवनची उद्दिष्टे : 
* स्पर्धा परीक्षा केंद्रातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 
* बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम 
* सैन्य दलात प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन 
* सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका 
* समारंभासाठी सुसज्ज तीन ते पाच हजार आसन क्षमतेचे सभागृह 
* विशेष सभा व बैठकांसाठी कॉन्फरन्स हॉल 
* परगावाहून आलेल्या निमंत्रितांची निवास व्यवस्था 
* शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन 
* मराठ्यांच्या इतिहास व अन्य विषयांवर सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधन केंद्र 
* महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण 
* नियमित मार्गदर्शनपर व्याख्यानमाला, चर्चासत्रे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com