एकवटला... आता लढा उद्धारासाठी!

एकवटला... आता लढा उद्धारासाठी!

‘मराठा एकवटतो, तेव्हा इतिहास घडतो,’ असे एक फलकवाक्‍य मराठा मोर्चादरम्यान लक्ष वेधून घेत होते. हे घोषवाक्‍य जितके खरे; तितकेच ‘फितूर झाल्यास पानिपत घडते,’ हाही मराठ्यांचा इतिहास आहे. आरक्षणासह विविध मुद्द्यांवर क्रांती घडविली. तिला यश मिळेल, हे त्रिकालाबाधित सत्य आहेच; परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांत हाच एकवटेला मराठा राजकीय संघर्षात पुन्हा विखुरला जाण्याची भीतीही व्यक्त केली जाते. मराठा समाजाची मोट बांधून संस्थात्मक उभारणी आवश्‍यक आहे. मागण्या मान्य होण्यास, घटना दुरुस्तीस कालावधी निश्‍चितपणे लागणार आहे, तोपर्यंत निश्‍चिंत राहण्यापेक्षाही ज्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलो, त्यांच्या उद्धारासाठी स्वकर्तृत्वाची लढाई करणे, हेच यशाचे गमक ठरेल.

खाण्यापिण्याची भ्रांत
महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अवघा मराठा एकवटला आहे. त्याला नेतृत्वही एकच आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. वर्षानुवर्षे पिचलेला मराठा समाज एकत्रित आला अन्‌ मनातील खदखद पुढे आली. राज्यभरातील मोर्चे जसे विराट झाले, तसाच मराठ्यांच्या एकेकाळच्या राजधानीला शोभेल असा मोर्चा साताऱ्यात निघाला. या मोर्चांनी राज्यभर लढाईची सुरवात यशस्वी केली. साताऱ्यात झालेल्या विराट मोर्चाचे श्रेय मोर्चाकडे वळलेल्या प्रत्येक पावलांना जाते, तसे त्यासाठी अविरत परिश्रम घेतलेल्या पद, प्रतिष्ठा आणि पैशांनीयुक्त मराठा समाजातील संघटकांनाही जाते. 
सातारा जिल्ह्यात बहुतांश समाज मराठा आहे. त्यातील ३० टक्‍के मराठा लोक ‘पॉवर’बाज असून, त्यांच्या हाती राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सूत्रे आहेत, हे सर्वमान्य आहे. मात्र, ७० टक्‍के समाजाला खाण्यापिण्याची भ्रांत आहे. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही, शिक्षण, बुद्धिमत्ता असूनही नोकरीत संधी मिळण्यासाठीची ‘अर्थ’चक्रे तो फिरवू शकत नाही. उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची जिद्द असूनही त्याला भांडवल नसते, वैद्यकीय उपचारांविना तो मृत्यूला कवटाळतो, वकिलांची फी भरायलाही कवड्या नसल्याने अन्याय झाला तरी न्यायालयाची पायरी चढत नाही. स्वत:चे घर घेऊ शकत नाही. बॅंक, पतसंस्थांत त्याची ‘पत’ नसते, हे विदारक सत्य पिचलेल्या मराठा समाजात आहेच. त्यांच्यासाठीच आरक्षण, शेतमालाला हमीभाव मिळावा, या प्रमुख दोन मागण्या पुढे केल्या आहेत. 

विधायकतेचा बांध
रस्त्यांवरील क्रांती घडली, तरी ‘संसद, घटने’त क्रांती घडविणे सहजसोपे नसणार आहे. नदीवर बांध बांधला तर ते धरण होते, त्यातील पाणी पिण्यास, सिंचनास उपयोगी ठरते, वीजनिर्मिती होते. याशिवाय अप्रत्यक्ष फायदेही त्यात असतात. मराठा समाजाचा प्रवाह एकत्रित आला आहेच, तर त्याला विधायकतेचा बांध हवा आहे. अनेक समाज/धर्मातील लोक नफ्यातील काही भाग काढून तो समाजातील बांधवांच्या उद्धारासाठी उपयोगात आणतात, हेच सूत्र मराठ्यांनी आत्मसात केले, तर पिचलेल्या मराठ्यांत आत्मसन्मान उभा राहील. 

‘अर्थ’क्रांतीची दारे
शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मराठा मुलांना शहरात यावे लागते, येथील शैक्षणिक शुल्क, खाण्यापिण्याचा,  

राहण्याचा खर्च त्यांना न परवडणारा असतो. त्यांच्यासाठी शैक्षणिक संकुल, गरीब परंतु बुद्धिमत्तेने ‘श्रीमंत’ मुलांसाठी शिष्यवृत्ती देऊन आरक्षणाची कमतरता भरू शकतो. मध्यंतरी मराठा समाजातील अनेक नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या नावांचे संदेश फिरत होते. त्यात मराठा मुलांना संधी द्यावी, असेही सूचित केले जात होते, ते खरेच आहे. उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, वकील, डॉक्‍टर यांसह विविध क्षेत्रांत मराठा समाज अग्रेसर आहे. त्यांनीच महिन्यातील एक दिवस, ठराविक काम आपला मराठा ‘वारसदार’ घडविण्यासाठी व्यतित करावा. त्यातून गोरगरीब मुलांचा बेरोजगारीचा प्रश्‍न तर मिटेलच, शिवाय ‘अर्थ’क्रांतीची दारे खुली होतील. 

‘मराठा माझा’
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा गावकी, भावकीचा वाद सुरू होईल आणि एकवटलेला मराठा पुन्हा विखुरला जाईल. लोकशाहीत ते घडेल. छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही मराठा समाजात रुजविण्यासाठी निवडणुका बाजूला ठेवत समाजकारण केले तरच समाजाच्या उद्धारासाठी आत्मसन्माची लढाई कायम राहील. खऱ्या अर्थाने समाजात क्रांती घडवायची असेल, तर ‘मराठा माझा’ वाटला पाहिजे, इतकेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com