बेळगावात तडाखेबाज मराठा हुंकार

maratha kranti morcha held in belgaum
maratha kranti morcha held in belgaum

बेळगाव - पोवाड्यांच्या ललकारीने बेळगावचा चौक अन्‌ चौक आज (गुरुवार) दुमदुमून गेला. सकाळी अकरा वाजता मराठा आणि मराठी मूक क्रांती मोर्चास प्रारंभ झाला. त्यानंतर गर्दी वाढत जाऊन भगव्या लाटेची क्रांतीच जणू बेळगावात अवतरली आणि "एक मराठा लाख मराठा'च्या दिलेल्या हाकेने शहर परिसर गर्दीने फुलून गेला.

मराठा समाजाच्या तडाखेबाज वादळाने अवघे शहरच आज भगवेमय झाले, तर मराठा वाघ रस्त्यावर उतरताच प्रत्येक रस्ता अन्‌ रस्ता मराठा क्रांतीच्या तेजाने झळाळून गेला. "रक्त मराठा, भक्त मराठा, फक्त मराठा'ची ज्योत मनात जागवत कोपर्डीच्या घटनेतील नराधमांना शिक्षा व्हावी, यासाठी मूक महामोर्चातून मागणी करत राहिला. निमित्त होते सकल मराठा समाजातर्फे आयोजित मराठा व मराठी क्रांती मूक महामोर्चाचे.

दुचाकी, चार चाकींमधून "मी मराठा'चा संदेश देत त्यांनी शहरात मुक्काम ठोकला. अंगात टी-शर्ट, डोक्‍यावर भगवी टोपी, हातात भगवे झेंडे घेत सकाळी आठनंतर मराठा मावळे रस्त्यावर उतरू लागले. शिवाजी उद्यानाजवळ सजविलेल्या व्यासपीठाजवळ गटागटाने मराठा तरुण एकत्र येत होते. मराठा रणरागिणीसुद्धा रस्त्यावर येत होत्या. पाच, दहा, पन्नास, शंभरच्या गटागटाने रस्त्यावर उतरत या रणरागिणींनी "आम्ही जिजाऊंच्या लेकी आम्हाला काय कुणाची भीती'ची प्रचिती दिली. सकाळी नऊनंतर शहरातील रस्त्यारस्त्यांवर मराठा मावळे उभे होते. शिस्तबद्धतेने खांद्यावर झेंडे घेत ते शिवाजी उद्यानाकडे जात होते. ज्येष्ठ नागरिक आपल्या नातलगांना खांद्यावर घेऊन आले होते.

बेळगावातील मोर्चात सहभागी होण्यासाठी आसपासच्या गावागावांत ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, महिला यांची रात्रीपासूनच लगबग सुरू झाली. रात्री दहापासूनच हत्तरगी, चिक्कोडी, येळूर, सुलगा, हिंडलगा, उचगाव, कडोली, हलगा, बस्तवाड, कुद्रेमानी, खानापूर, कंग्राळी, काकती, कर्ले, किणये, नावगे, बिजगर्णी, देसूर, मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी, मजगाव, जांबोटी, कणकुंबी, चिरमुरी, कल्लेहोळ, बेळगुंदी आदी गावांतून त्यांचे जथ्थे येत राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com