मोर्चासाठी जनतेच्या मागूनच या!

सुनील पाटील
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - कोणाच्याही पाठिंब्याशिवाय, कोणत्याही राजकीय पक्षाला न जुमानता, कोणत्याही नेत्याचा सहभाग न घेता राज्यात मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पक्ष, संघटना आणि राजकारणविरहित असणाऱ्या या मोर्चाला सर्व जाती-धर्मांचे लोक पाठिंबा देत आहेत. कोल्हापुरात मात्र विविध पक्ष आणि काही राजकीय नेते ठिकठिकाणी मोर्चा नियोजनाच्या बैठका घेत आहेत. यापूर्वीच्या सर्व मोर्चांमध्ये सर्वसामान्य मराठा पुढे व नेते मागे असे चित्र आहे. हेच चित्र कोल्हापुरातील मोर्चात दिसावे, अशी अपेक्षा सामान्य मराठ्यांकडून व्यक्त होत आहे.

कोल्हापूर - कोणाच्याही पाठिंब्याशिवाय, कोणत्याही राजकीय पक्षाला न जुमानता, कोणत्याही नेत्याचा सहभाग न घेता राज्यात मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पक्ष, संघटना आणि राजकारणविरहित असणाऱ्या या मोर्चाला सर्व जाती-धर्मांचे लोक पाठिंबा देत आहेत. कोल्हापुरात मात्र विविध पक्ष आणि काही राजकीय नेते ठिकठिकाणी मोर्चा नियोजनाच्या बैठका घेत आहेत. यापूर्वीच्या सर्व मोर्चांमध्ये सर्वसामान्य मराठा पुढे व नेते मागे असे चित्र आहे. हेच चित्र कोल्हापुरातील मोर्चात दिसावे, अशी अपेक्षा सामान्य मराठ्यांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावरून ‘तुम्ही जनतेच्या मागून या’ अशा पोस्टच्या माध्यमातून  लोकप्रतिनिधींना सुचवले जात आहे. तसेच श्रेयवादासाठी कोणत्याही स्वतंत्र ठिकाणी बैठका नकोच, तर संयोजन समितीच्या छत्राखालीच बैठका व्हाव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रभर निघालेले सर्व मोर्चे कोणाच्या ‘रसदी’वर निघाले नाहीत. घरातून भाजी-भाकरी घेऊन आणि स्वखर्चाने येणाऱ्या या मोर्चेकऱ्यांनी प्रत्येक मोर्चाला गर्दीचा उच्चांक गाठत वेगळेपण दाखवून दिले आहे. वास्तविक कोणत्याही नेत्याने आवाहन करावे, संयोजकांना लाखोंची देणगी द्यावी, अशी अपेक्षाच नाही. १५ ऑक्‍टोबरला कोल्हापुरात मोर्चा निघणार आहे. या वेळी लाखोंची गर्दी होणार हे स्पष्टच आहे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने आवाहन करायची गरजच नाही; पण काही नेते वैयक्तिक पातळीवर बैठक घेऊन मोर्चाचे नियोजन करण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. सकल मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी गेल्या महिन्यात मंगळवार पेठेत पहिली बैठक झाली. बैठकीत उपस्थित कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी मते मांडली. ‘कोणत्याही आजी-माजी आमदार, खासदाराने मी माझ्या तालुक्‍यातून किंवा मतदारसंघातून अमुक एवढे लोक घेऊन येतो, तमुक एवढा जनसमुदाय उभा करतो, असे सांगू नये. तुम्हाला मोर्चासाठी माणसे आणावी लागणार नाहीत. जनतेच्या मागूनच तुम्हाला यावे लागेल,’ असे आवाहन सकल मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने केले होते. याहीपेक्षा ‘तुम्ही नाही आला तर चालेल, पण शक्तिप्रदर्शनाचे राजकारण नको,’ असा इशाराही या वेळी दिला होता, तरीही वेगळी चूल मांडून यात राजकारण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ ‘सकल मराठा क्रांती मूक मोर्चा’ या नावाखाली एकवटलेला ‘मराठा’ कोल्हापुरात राजकारणाच्या गटात विभागू नये, अशी अपेक्षा सोशल मीडियावरून जोर धरू लागली आहे.

Web Title: maratha kranti morcha in kolhapur

टॅग्स