वॉर रूममधून क्रांतीचा जागर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या अनुषंगाने रोजच्या घडामोडींची ‘मिनिट टू मिनिट’ माहिती आता मराठा क्रांती मोर्चा वॉर रूमच्या माध्यमातून मिळणार आहे.

कोल्हापूर - मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या अनुषंगाने रोजच्या घडामोडींची ‘मिनिट टू मिनिट’ माहिती आता मराठा क्रांती मोर्चा वॉर रूमच्या माध्यमातून मिळणार आहे.

सकल मराठा सोशल मीडियाद्वारे मराठा क्रांती मोर्चाचा जागर मांडला जाणार असून सोशल मीडियाच्या टीमचा येथे दिवसभर राबता राहणार आहे. या वॉर रूमचे मराठा रणरागिणींच्या हस्ते मोठ्या दिमाखात आज उद्‌घाटन झाले आणि दसरा चौकाचा परिसर ‘एक मराठा लाख मराठा’च्या जयघोषाने दणाणून गेला. सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मोर्चा वॉर रूम व्हाइट हाउसमध्ये तयार करण्यात आली आहे. 
लतादेवी जाधव, पद्मावती पाटील, नेहा मुळीक, शैलजा भोसले, दीपा पाटील, मेघा मुळीक, सिद्धी घाटगे उपस्थित होत्या. 

वॉर रूममध्ये शिरीष जाधव, अक्षय शिंदे, प्रशांत बरगे, मनोज नरके, प्रतीक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा सोशल मीडियाची टीम कार्यरत असणार आहे. www.marathakrantikop.com या वेबसाइटवर मराठा क्रांती मोर्चातील मागण्या, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, महामोर्चाचा मार्ग, मराठा क्रांतीच्या लोगोसाठी विविध डिझाइन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशनची सोय आहे. वॉर रूमच्या माध्यमातून ही टीम वेबसाइटची माहिती येथे येणाऱ्या प्रत्येक बांधवाला सांगणार असून त्यांची नोंदणी करून घेणार आहे. त्याच बरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या फेसबुक पेजविषयीची माहितीही देणार आहे. 

सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत ही टीम येथे कार्यरत असेल. त्याच बरोबर या ठिकाणाहून टी शर्ट वाटप, दिवसभरातील नियोजन बैठका, सभा यांची माहिती दिली जाणार आहे. याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, जयेश कदम, सचिन तोडकर, महेश जाधव, चंदकांत जाधव, दिलीप देसाई, कमलाकर जगदाळे, शंकरराव शेळके, दिगंबर फराकटे, उदय भोसले, सचिन नांगरे, रामदास पाटील, हर्षल सुर्वे, शशिकांत पाटील, सुरेश इंगवले, अमित आडसुळे, उत्तम नलवडे, अवधूत पाटील उपस्थित होते.   

एक मराठा, लाख मराठा
वॉर रूमचे उद्‌घाटन सायंकाळी पाचला होणार असल्याने मराठा बांधवांनी दुपारी चारपासूनच येथे हजेरी लावली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषात वॉर रूमचे उद्‌घाटन करण्यात आले.