कारणं नकोत, मोर्चाला यायचंच

बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मला मोर्चात जायची सवय नाही, गर्दीत जमत नाही, काम-धंदा सोडून यायचे का, माझ्या न येण्याने काय फरक पडतो, आज काय तब्येत बरी नाही, अशी कोणतीही कारणे न देता १५ ऑक्‍टोबरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी व्हायलाच हवे, असा आग्रह सोशल मीडियावरून केला जात आहे. 

कोल्हापूर - मला मोर्चात जायची सवय नाही, गर्दीत जमत नाही, काम-धंदा सोडून यायचे का, माझ्या न येण्याने काय फरक पडतो, आज काय तब्येत बरी नाही, अशी कोणतीही कारणे न देता १५ ऑक्‍टोबरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी व्हायलाच हवे, असा आग्रह सोशल मीडियावरून केला जात आहे. 

बैठका, मेळाव्यातील गर्दी प्रत्यक्ष रस्त्यावर कशी येईल, यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. कोणतेही सार्वजनिक काम असले की अनेकांना व्यक्तिगत अडचणी सांगायची सवय तशी जुनीच आहे. मोर्चे काढतात ना काढू देत, आपले काही त्याच्याशी देणे-घेणे नाही, असा विचार करणारी मंडळीही काही कमी नाहीत. ‘पदरचे खा आणि लष्कराच्या भाकरी कशासाठी भाजायच्या’, अशीही मानसिकता असते. 

१५ ऑक्‍टोबरला क्रांती मोर्चा हा या मानसिकतेला छेद देणारा आहे. वर्षानुवर्षांची मनातील खदखद आणि आक्रोश बाहेर पडत आहे. ठराविक जणांनी मोर्चाची तयारी करावी, रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून फिरावे आणि अनेकांनी प्रत्यक्ष मोर्चात सहभागी न होता घरी बसून टीव्हीवर मोर्चाचा आनंद घ्यावा हे कुणाला पटणारे नाही. ज्याला अंथरुणावरून उठता येत नाही अथवा डॉक्‍टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे अशांचे मोर्चाला न येण्याचे कारण कुणीही समजू शकते; मात्र जे धडधाकट आणि ज्यांना जिमला जाण्यासाठी वेळ आहे आणि मोर्चाचे नाव काढले की गप्प बसायचे, अशांसाठी मात्र सोशल मीडियावरून फिरणारे मेसेज डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. 

सोशल मीडियावरून फिरणारे मेसेज अनेकांना विचार करायला लावणारे आहेत. सार्वजनिक प्रश्‍नावर मोर्चा अथवा आंदोलन असले की त्याच्याशी फटकून वागणारे अनेक जण आहेत. कोल्हापुरातील टोलविरोधी लढा ज्यांच्या चारचाकी गाड्या नाहीत अशा लोकांनी यशस्वी केला. ज्यांच्या गाड्या आहेत अशी मंडळी मात्र आंदोलनापासून दूर राहिली. मराठा क्रांती मोर्चा पूर्वीच्या अनेक मोर्चांचे रेकॉर्ड तोडणार आहे. केवळ मराठाच नव्हे तर सर्व जातिधर्माच्या बांधवांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कारणे सांगायची नाहीत, तर मोर्चात सहभागी व्हायचे, हा मेसेज लोकप्रिय ठरू लागला आहे. 

आंदोलनासाठी दिली जाणारी कारणे अशी...
पत्नी जाऊ देत नाही, खिशात पैसेच नाहीत, मोर्चाला जाण्याची सवय नाही, प्रवास सहन होत नाही, गर्दीत जमत नाही, मी एकुलता एक आहे, तब्येत बरी नाही, मळमळ होते, आजी आजारी आहे, पाहुण्यांचे जाऊळ आहे, कुणाचे बारावे आहे, आपला विषयच नाही, मी नसलो तरी काय होणार नाही, जनावर आजारी आहे, मोर्चात होतो म्हणून सांग...

Web Title: maratha kranti morcha in kolhapur