संयोजकांचा निर्णय मान्य - चंद्रकांतदादा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याबाबत संयोजकांचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

शनिवारी (ता. १५) होणाऱ्या मोर्चानंतर पालकमंत्र्यांच्या निवेदन स्वीकारण्याच्या भूमिकेवरून सकल मराठा क्रांती मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड विरोध होता. त्याची दखल घेत मंत्री पाटील यांनी आपल्याला निर्णय मान्य असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. 

मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारीच स्वीकारणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
राज्यात जे मोर्चे झाले त्या सर्व मोर्चांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चे विसर्जित करण्यात आले होते. कोल्हापूरमध्ये मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारण्याबाबत आग्रही होते. त्याला सकल मराठा समाजातून तीव्र विरोध झाला. याशिवाय, संयोजन समितीनेही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारावे, अन्यथा मोर्चा विसर्जित होणार नाही, असा इशारा दिल्याने पालकमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘१५ ऑक्‍टोबरला सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मराठा क्रांती मूक मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, मोर्चाकडून दिल्या जाणाऱ्या निवेदनाबाबत संयोजकांनी दिलेला निर्णय आपल्याला मान्य आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी भाजप-शिवसेना सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी सरकार बांधील आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची मदत घेतली जाईल.

सरकार मागण्यांबाबत सकारात्मक आहे; पण चर्चेची कोंडी झाल्याचे चित्र आहे. मागण्यांविषयी थेट चर्चा करावी, ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. यातूनच मागण्यांविषयी समन्वय साधला जावा. केवळ याच हेतूने १५ ऑक्‍टोबरला निघणाऱ्या मोर्चाचे निवेदन सरकारचा प्रतिनिधी म्हणून स्वत:च स्वीकारावे, अशी भूमिका होती. सरकारच्या वतीने मागण्यांविषयी स्वत:हून एक पाऊल पुढे येऊन मराठा समाजाबरोबर चर्चा व्हावी, या भूमिकेतून स्वत: निवेदन स्वीकारण्याचा मनोदय व्यक्त केला होता; पण संयोजकांची भूमिका वेगळी आहे. ती आपल्याला मान्य आहे. मोर्चा शांततेने पार पडावा. मराठा समाजाची एकी यानिमित्ताने व्यक्त होत आहे. ती अभंग रहावी, ही आपली इच्छा आहे.

राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी  वचनबद्ध आहे.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री