आश्‍वासने नकोत... ठोस पावले उचला...

आश्‍वासने नकोत... ठोस पावले उचला...

गेली अनेक वर्षे मराठा समाजाची मुले सर्वच क्षेत्रांत दबली जात आहेत. ९० टक्के मार्क्‍स मिळूनही युवक युवतींचे करिअर घडत नाही. या मोर्चातून आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी मिळतील, तसेच पुढील पिढीला याचा चांगला फायदा होईल.
- गिरिजा पाटील (सातारा) 

शैक्षणिक प्रवेशावेळी मराठा समाजातील मुलांची होणारी अडचण दूर होण्यासाठी व नोकरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. कोपर्डी घटनेतील आरोपींना कडक शासन व यापुढे कोणत्याही समाजातील मुलींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, यासाठी हा मोर्चा आहे.
- श्रद्धा शिंदे (सातारा)

आमच्या पुढील पिढीला आरक्षणाचा फायदा होऊन त्यांना नोकरी व रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आम्ही मोर्चात सहभागी झालो आहे. मोर्चाच्या दबावामुळे आरक्षण मिळाल्यास आमच्या सर्व बंधूभगिनींना फायदा मिळेल, तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना जास्तीतजास्त कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. 
- प्रियांका पवार (जकातवाडी)

चांगले मार्क्‍स मिळूनही मराठा समाजातील मुलांना  इंजिनिअर, मेडिकल, तसेच आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेता येत नाही. या मोर्चाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले, तर पुढील पिढीला याचा चांगला फायदा होईल. कोपर्डी घटनेतील आरोपींना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही युवती रस्त्यावर उतरलो आहोत.
- स्वाती पवार (सातारा)

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आम्हा विद्यार्थ्यांना, युवक युवतींना करिअर करताना, शिक्षण घेताना किती अडचणी येतात त्याची कल्पना नाही. आजवर आम्ही या साऱ्याला सामोरे गेलो. कीती दिवस हे सोसायचे. कोपर्डीतील बालिका अत्याचाराला बळी पडली आहे. तिला न्याय मिळाला पाहिजे. समाज, प्रशासन सर्वांना जाग आणण्यासाठी मी या मोर्चात सहभागी झाले आहे.
- मयुरी शेळके (तुकाईवाडी)

कोपर्डी येथील भगिनीस नराधमांच्या अत्याचारास सामोरे जावे लागले. समाजातील ही परिस्थिती वाईट आहे. त्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी नराधमांना फाशीच दिले पाहिजे. समाजातील विद्यार्थ्यांना युवकांना आता आरक्षण मिळालेच पाहिजे.
- रिद्धी कदम (मलवडी, ता. माण) 

मराठ समाजाला आरक्षणाची आता खरी गरज निर्माण झाली आहे. समाजात कितीतरी कुटुंबे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाहीत. शिक्षण घेतले, तरी कुठेच आरक्षण नसल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. घरोघरी बेरोजगार वाढत आहेत. त्यामुळेच आम्हाला आज रस्त्यावर उतरावे लागले आहे.
- सुजाता पाटील, गृहिणी माजगाव, ता. पाटण

आज शेतकऱ्यांच्या शेतमालास दर मिळत नाही. शेतकऱ्यांची मुले शिकायची, कमवायला लागायची म्हटले, की त्यांना कोठेही आरक्षण मिळत नाही. आम्ही काढलेला मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. तो आम्हाला न्याय मिळावा यासाठी आहे.
- मंगल उत्तम घाडगे (काशीळ, ता. सातारा)

युवती, महिलांची भावना; ‘भगवी’ लाट ‘युवामय’
सातारा - ‘मराठा समाजाने काढलेल्या क्रांती मोर्चामुळे सरकारची मानसिकता निश्‍चित बदलेल. कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशीच द्यावी, या आमच्या न्याय्य मागण्या आहेत. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असून, जाती- धर्माच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. त्यामुळे या कायद्यात आवश्‍यक ती दुरुस्ती झाली पाहिजे, तसेच मराठ्यांच्या विकासासाठी आरक्षण मिळणे गरजेचे आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत लाखो युवक- युवती व महिला मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले. साताऱ्याबरोबरच कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झालेल्या तरुणाईमुळे उसळलेली ‘भगवी’ लाट ‘युवामय’ झाली होती.
हातात ‘भगवे’ झेंडे घेऊन डोक्‍यावर ‘एक मराठा.., लाख मराठा...’, ‘मी मराठा..’ अशा घोषणा रंगविलेल्या टोप्या घातलेल्या युवकांच्या हातातील फलक वाचले जात होते अन्‌ त्यातून ‘मूक’पणे भावना व्यक्त करणारे लाखो युवक- युवती हे मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील क्रांती मोर्चाचे मुख्य आकर्षण ठरले. हुल्लडबाजी न करणारे..., महिलांना वाट करून देणारे..., दिलेल्या सूचनांचे पालन करणारे... आणि मुख्य म्हणजे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आगेकूच करत उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी होणारा ‘युवावर्ग’ न्याय्य मागण्यांसाठी एकवटल्याचे आज सातारकरांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील युवकांबरोबरच कोकण परिसरातील युवकही मोठ्या संख्येने मोर्चासाठी साताऱ्यात दाखल झाले होते. 

लाखो युवक प्रत्यक्ष मोर्चात सहभागी झाले खरे; परंतु अनेकांनी स्वयंसेवक म्हणूनही आपली सेवा रुजू केली. ॲट्रॉसिटी कायद्यातील बदल, मराठा समाजाकडे नेत्यांनी केलेले दुर्लक्ष, मराठा समाजाचे आरक्षण यांसारख्या वेगवेगळ्या मागण्या आणि संबंधित विषयांवर तरुण- तरुणी प्रभावीपणे बोलके होत होते. 

‘फक्त आश्‍वासने देण्यापेक्षा ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे,’ असा पुकारही ‘मूकपणे’ घोषणांच्या फलकाद्वारे त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयीन युवक- युवती, शालेय विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते.

...आणि मोर्चा ‘सफल’ ठरला
सातारा - ११ सप्टेंबरला मराठा मोर्चाची बैठक झाली आणि तीन ऑक्‍टोबर तारीख ठरली. तेथपासून आजपर्यंत हजारो मराठ्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. त्याची परिणती आजच्या लाखोंच्या गर्दीत दिसून आली. तीन आठवडे अथक परिश्रमाने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मराठा क्रांतीचा निनाद घुमविला गेला. त्यासाठी आयोजकांनी पडद्याआडून  केलेली धावपळ, स्वयंसेवकांनी घेतलेले कष्ट, तरुणाईचा प्रचंड उत्साह, प्रसार माध्यमांचे सहकार्य, समाजाच्या सर्व स्तरांतील विविध संघटना, प्रशासनाचा पाठिंबा आणि सहकार्य... यामुळे भव्य मोर्चा निघण्यापर्यंत मराठा ‘सफल’ ठरला. 
साताऱ्याच्या मातीने अनेक इतिहास घडविले, पाहिले आहेत, त्यात आता मराठा क्रांती मोर्चाचा इतिहासही ठळकपणे लिहिला गेला. या मोर्चाने जिल्ह्यातील मराठा समाजाला लाखमोलाचे बळ मिळाले असून, त्यातून उद्याच्या क्रांतीची बीजे पेरली गेली. मोर्चाच्या आयोजनासाठी महिनाभर अनेक जण अक्षरशः दिवसरात्र राबले. विशेष म्हणजे काम कोणतेही असो, दिलेले काम प्रत्येकाने ठरल्यानुसार पार पाडले. कोणतेही नेतृत्व नसतानाही हा मोर्चा अत्यंत यशस्वी होण्यामागे स्वयंस्फूर्ती हेच यशाचे गमक ठरले. ११ सप्टेंबर रोजी येथील स्वराज्य मंगल कार्यालयात पहिली बैठक झाली आणि तेथून मराठा क्रांतीचे वारे जिल्हाभर फिरले. ते आज पुन्हा साताऱ्यात येवून एकवटले. 
मोर्चात स्वता:चे कार्यकर्तृत्व समर्पण करण्यासाठी हजारो मराठ्यांनी आपली निपुणता त्यासाठी वाहिली. कोणी सोशल मीडिया, कोणी माध्यमांचे काम घेतले, कोणी गावोगावी बैठका घेतल्या, कोणी महिलांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. महाविद्यालयीन युवक-युवतींना संपर्क करण्यापासून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची कामे कोणी केली. लोगोपासून ते फलकापर्यंत प्रत्येक ठिकाणी केंद्रीकरण केलेली स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती, या सर्वांचा परिपाक म्हणून हा मोर्चा एकमेवाद्वितीय ठरला. 

‘मूक’आवाज
मोर्चा लहान असो की मध्यम, साताऱ्यातील रस्त्यांनी त्याच्या घोषणा ऐकल्याच; परंतु आज ‘न भूतो...’ असा मोर्चा अख्ख्या साताऱ्याने अनुभवला. मूक मोर्चा असातानाही त्याचा ‘मूक’आवाज मात्र सर्वांनी ऐकला. वाहनांवरील स्टिकर्स, हातावरील टॅटू, मेहंदी, हातात मागण्यांचे फलक, टी-शर्टवरील मागण्या, मूक आक्रोश यामुळे अप्रत्यक्षपणे मोर्चाला आवाजच प्राप्त झाला. ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ असे स्टिकर्स असलेल्या चारचाकी, दुचाकी, त्यावर लावलेले भगवे झेंडे, खिशाला अडकविलेले बिल्ले आणि अंगात घातलेले टी- शर्ट, शर्ट, डोक्‍यावरील शिवपुतळे, हातातील उंचच्या उंच भगवे झेंडे यामुळे वातावरण क्रांितमय झाले. मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हाभर लावलेले फलक मोर्चाबद्दल बोलणारे होते. कोपर्डीच्या नराधमांना फक्त फाशीच, ॲट्रॉसिटी कायदा रद्द झालाच पाहिजे, बापाला दुष्काळ जगू देत नाही, पोराला आरक्षण शिकू देत नाही, शिवस्मारक झालेच पाहिजे, खबरदार जर आमच्या लेकींना छेडाल तर...अशा घोषणांचे फलक, गळ्यात अडकविलेले भगवे स्कार्फ, डोक्‍यावरील भगव्या टोप्या, कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले भगवे ध्वज यामुळे शहर भगवे झाले. कोणीही घोषणा देत नसतानाही हातात धरले मागणी फलक, अंगावर रंगकाम केलेल्या मागण्या, टोपी, शर्टवर लिहिली वाक्‍ये भरीच बोलून जात होती. परिणामी मोर्चालाही ‘मूक’आवाज प्राप्त झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com