#MarathaKrantiMorcha मराठ्यांचा पुन्हा एल्गार

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी कार्यकर्त्यांनी व्हीनस कॉर्नर ते दसरा चौकादरम्यान काढलेली मोटारसायकल रॅली.
कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी कार्यकर्त्यांनी व्हीनस कॉर्नर ते दसरा चौकादरम्यान काढलेली मोटारसायकल रॅली.

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन; शाळा, दुकाने बंद
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारलेल्या क्रांती ठोक मोर्चाने शहरात आज उत्स्फूर्त बंद राहिला. 

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा’ अशा जयघोषात निघालेल्या दुचाकी फेरीने दुपारनंतर दुकाने पटापट बंद झाली. शहर परिसरातील शाळाही बंद राहिल्या. हक्कासाठी आलोय लढायला दसरा चौकात, अशी शाहिरी गर्जना देत बेमुदत ठिय्या आंदोलनास दसरा चौकात सुरुवात झाली आणि ‘एक मराठा लाख मराठा’च्या गर्जनेने चौक दिवसभर दणाणून गेला. दरम्यान, दुपारनंतर व्यवहार पूर्ववत झाले. आरक्षणासाठीचा लढा तीव्र करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे काल (ता. २३) बेमुदत ठिय्या आंदोलन जाहीर केले. 

सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचा मेसेजही फिरत होता. विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. परिणामी पालकच मुलांना शाळेपर्यंत घेऊन गेले. मात्र, शाळा प्रशासनाने अधिकृत सुटी जाहीर न करता पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुलांना शाळेत सोडावे, असे सांगितले. पालकांनी तणावाची स्थिती लक्षात घेत मुलांना घरी नेणे पसंत केले. शाळांना अघोषित सुटी जाहीर झाल्याची स्थिती होती. 

ग्रामीण भागासह कसबा बावडा, उपनगरांतून कार्यकर्ते दसरा चौकात सकाळीच मराठा बांधव दाखल झाले होते. राजारामपुरीतून दुचाकी फेरीही दसरा चौकात आली. यानंतर तेथूनच शहरातील व्यवहार बंद करण्याची हाक दिली. तेथून हातात भगवे झेंडे, डोक्‍यावर भगव्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष केला. उमा टॉकीज, आझाद चौक ते टेंबे रोडच्या दिशेने फेरी निघाली असताना मार्गावरील दुकाने पटापट बंद झाली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते पापाची तिकटी मार्गावर दुचाकी फेरी येत असल्याचे पाहताच दुकानांची शटर ओढली. छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, लुगडी ओळ ते महाराणा प्रताप चौकातून घोषणा देत ही फेरी आईसाहेब महाराज पुतळा येथून पुन्हा दसरा चौकात आली. याच वेळी पावसाने हजेरी लावली. तरीही कार्यकर्ते भिजत आक्रमक होऊन ‘दुकाने बंद करा’, असा इशारा देत मध्यवर्ती बस स्थानकाकडे रवाना झाले. त्यामुळे बघता बघता शहरातील व्यवहार बंद झाले.

रुग्णवाहिकांना वाट
नागपंथी डवरी समाजाच्या मोर्चास दसरा चौकातून सुरुवात होणार होती. येथे युवक, महिला, मुले, नागरिक आले होते. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची मराठा समाजाने दक्षता घ्यावी, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे माईकवरून करण्यात येत होते. तसेच सकल मराठा समाजाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने असून, कोणीही तोडफोड करू नये, असेही सांगितले जात होते. याच वेळी येथून जाणाऱ्या रुग्णवाहिकांना वाट करून दिली जात होती. 

रंकाळा टॉवर येथे टायर पेटविले
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक मराठा तरुणांनी रंकाळा टॉवर येथे दुपारी साडेचार वाजता टायर पेटवून संताप व्यक्त केला. बिनखांबी गणेश मंदिर व महाद्वार रोड येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला. आयसोलेशन रोड परिसरातून तरुणांनी फेरी काढून लोकांचे लक्ष वेधले. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात क्रांती ठोक ठिय्या आंदोलन सकाळी सुरू झाले. येथून कार्यकर्त्यांनी शहर परिसरातून फेरी काढली. तीनपर्यंत येथे भाषणे झाली. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र, रंकाळा टॉवर येथे तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होऊन एकत्र आले. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा दिल्या. घोषणा देणारे तरुण पाहून परिसरातील लोकांनी गर्दी केली. तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारविरोधात रोष व्यक्त केला. जाऊळाचा गणपती ते शालिनी पॅलेस मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. 

राजस्थानी समाजाचा पाठिंबा
राजस्थानी जैन समाजाने ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. भविष्यातील सर्व आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात आले. समाजाचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, नगरसेवक ईश्‍वर परमार, जवाहर गांधी, राजेश निंबाजीया, मोहन ओसवाल, प्रकाश ओसवाल, माणिक ओसवाल, कांतिलाल ओसवाल आदी उपस्थित होते.

‘केएमटी’चे नुकसान अडीच लाखांचे
आजच्या बंदमुळे केएमटीचे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले. बंदची स्थिती पाहता केएमटीने ९८ गाड्या रस्त्यावर उतरविल्या. दुपारी कागलमध्ये मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरल्याने गोकुळ शिरगावपासून कागलकडे जाणारी वाहतूक थांबविली. 

बंदवेळी केएमटीला लक्ष्य केले जाते, मात्र आज एकाही गाडीचे नुकसान झाले नाही. शाळा महाविद्यालये बंद राहिल्याने त्याचाही परिणाम प्रवासी संख्येवर दिसून आला. 

ऊठ मराठ्या खवळून मर्दा
शाहीर दिलीप सावंत यांनी शाहिरीतून मराठा आरक्षणाची मागणी केली. ऊठ मराठ्या खवळून मर्दा, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या शाहिरीने बांधवांच्या अंगावर रोमांच उभे केले. शाहीर तृप्ती सावंत हिने रणरागिणी ताराराणी यांचा पोवाडा सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com