सभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त

Film-Industry
Film-Industry

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या दृष्टीने आवश्‍यक तयारीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विद्यमान संचालक मंडळ सव्वादोन वर्षांपूर्वी सत्तेवर आले; मात्र त्यानंतर एकही सर्वसाधारण सभा झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर या सभेकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल नऊ पॅनेल आणि १२० उमेदवार, अशी अटीतटीची निवडणूक एप्रिल २०१६ मध्ये झाली. विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या समर्थ आघाडीने नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधून महामंडळावर सत्ता आणली. नवीन संचालक मंडळाने गेल्या सव्वादोन वर्षांत काही चांगले निर्णयही घेतले. मोफत ऑडिशन, कोल्हापूर चित्रनगरीला निधी, महामंडळाच्या शाखांचा विस्तार, शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसाठी नियमावली, भरारी पथके आदी निर्णयांचा त्यात समावेश आहे. 

एकीकडे बॉलीवूडस्टार प्रियांका चोप्रा, अक्षयकुमार, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, जॉन अब्राहम यांच्यासारखे सेलिब्रिटी मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी पुढे सरसावले आहेत. एकाहून एक सरस कलाकृती त्यांच्याकडून साकारल्या जात आहेत, मात्र दुसरीकडे चित्रपट महामंडळाचा बहुतांशी कारभार न्यायालयीन कामातच अधिक अडकला आहे, हे वास्तव आहे. 

वर्षात आठवडे ५२ आणि सुमारे ९०  ते ११० मराठी चित्रपटांची निर्मिती होते. सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने अजूनही या चित्रपटांना प्रदर्शनासाठी वेटिंग लिस्टवर राहावे लागते. मंगल कार्यालये, सांस्कृतिक हॉल पर्याय म्हणून पुढे आले. त्यानंतर व्हिडिओ पार्लरमध्ये छोटे थिएटर ही संकल्पना पुढे आली आहे. मात्र, ती अजूनही कागदावरच आहे. त्याशिवाय निर्मात्यापासून ते कलाकार-तंत्रज्ञांपर्यंतचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. सर्वसाधारण सभेत अशा साऱ्याच विषयावर सकारात्मक चर्चा अपेक्षित आहे.

महामंडळाचा कारभार पारदर्शकच आहे. अनेक सभासदाभिमुख चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे केवळ मागील दोन वर्षांचाच नव्हे तर २०१७-१८ आर्थिक वर्षाचा अहवालसुद्धा सभेपुढे ठेवणार आहे.
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, चित्रपट महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com