वाहनाच्या धडकेत नवरदेवाचा मृत्यू 

वाहनाच्या धडकेत नवरदेवाचा मृत्यू 

कोरेगाव - आज सायंकाळी सव्वापाचचा विवाह मुहूर्त... त्या निमित्ताने येथील बर्गे कुटुंबाच्या घरात असलेले मंगलमय वातावरण... पहाटेपासूनच सुरू असलेली धामधूम... या पार्श्‍वभूमीवर सकाळच्या प्रहरी फिरण्यासाठी गेलेल्या नियोजित वराचा अपघाती मृत्यू झाला आणि बर्गे कुटुंबासह संपूर्ण शहरावर आज शोककळा पसरली. गणेश विश्‍वासराव बर्गे (वय 35, रा. आझाद चौक, बाजार रोड, कोरेगाव) असे अपघाती मृत्यू झालेल्या नियोजित वराचे नाव आहे. 

कोरेगाव- सातारा मार्गावर शासकीय विश्रामगृहाजवळ एका स्टीलच्या दुकानासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील मंगल कार्यालयात आज सायंकाळी गणेशचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्यासाठी मोठ्या हर्षोल्साहात तयारी सुरू होती. काल (ता. 20) सायंकाळी गणेशचा वर्धावा (श्रीवंदन) निघाला. त्याला घोड्यावर बसलेला पाहून आनंदी झालेल्या त्याच्या सवंगड्यांनी बॅंडच्या तालावर ठेका धरला होता. सवंगड्यांच्या या आनंदात गणेशदेखील सहभागी झाला होता. या पार्श्‍वभूमीवर आज विवाहाचा प्रत्यक्ष दिवस उजाडला. पहाटेपासूनच बर्गे कुटुंबामध्ये धामधूम सुरू होती. गणेशदेखील लवकर उठला. पाय दुखू लागलेत म्हणून थोडे पाय मोकळे करून येतो, असे म्हणत तो सकाळच्या प्रहरी फिरण्यासाठी घराबाहेर पडला. त्याला बहिणींसह कुटुंबातील लोकांनी घराबाहेर न जाण्याची विनंती केली; परंतु लगेच येतो, असे म्हणत तो गेला आणि काही वेळातच त्याला अपघात झाला. त्या संदर्भात गणेशचे चुलत बंधू महेश शामराव बर्गे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार बागवान तपास करत आहेत. 

कुटुंबातील एकुलता एक... 
गणेश हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. कुटुंबात एकुलता एक असल्याने वडिलांच्या पश्‍चात त्याने शेतीबरोबरच वीटभट्टी आणि लाकडाच्या वखारीच्या व्यवसायाची धुरा खांद्यावर घेतली होती. वडिलांनी स्थापन केलेल्या जनता सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्षपद, तसेच आझाद युवक गणेश मंडळाचे अध्यक्षपदही त्याने भूषवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com