सोलापूर बाजार समितीत लिलाव बंद 

वैभव गाढवे
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

सोलापूर बाजार समितीच्या आवारातून गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज व्यापाऱ्याचा उद्रेक झाला व त्यांनी लिलाव बंद पाडले.

सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने व्यापाऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद पाडले. मात्र, व्यापाऱ्यांच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने व्यापाऱ्यांच्या कृतीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता. दरम्यान, बाजार समिती प्रशासकांचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असताना दोन्ही बाजूने गोंधळ झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

सोलापूर बाजार समितीच्या आवारातून गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज व्यापाऱ्याचा उद्रेक झाला व त्यांनी लिलाव बंद पाडले. कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने एका ट्रकमागे सुमारे 50 ते 60 हजार रूपयांचे नुकसान होत असल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाच्या कानावर या घटना घालूनही चोऱ्या कमी होत नसल्याने व्यापाऱ्यानी लिलाव बंदचे पाऊल उचलले. तसेच लिलावाच्या अगोदर वजन न करता लिलाव झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या मालाचे वजन करावी, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी लावून धरली. यावेळी बाजार समिती प्रशासक श्री. भोळे या मागण्या मान्य करून लवकरात लवकर बाजार समितीमध्ये सुरक्षा वाढवू, असे सांगतिले. मात्र व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या प्रश्नावर आताच ताबतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात होती. 

शेतकऱ्यांचा संताप्त व्यापाऱ्यांच्या लिलाव बंदचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. येथील बाजार समितीमध्ये महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. शेतकऱ्यांनी काल कांद्याच्या गोण्या भरल्या होत्या. त्यानंतर आज लवकर लिलाव न झाल्याने सुमारे चोवीस तासानंतरही तो कांदा गोण्यांमध्येच होता. त्यामुळे या कांद्याचे नुकसान होण्याच्या भितीने शेतकऱ्यांचा राग आनावर झाला होता. व्यापाऱ्यांनी त्यांना काय बंद करायचा आहे, तो लिलाव झाल्यानंतर करावा किंवा उद्या बाजार समिती बंद ठेवावी व तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. दरम्यान, बाजार समितीमधून मोठ्या प्रमाणावर मालाची चोरी होत आहे. ही चोरी करणारी बहुतांशी माणसं बाजार समितीमधीलच आहेत, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

Web Title: Marathi News Auctioned in the Solapur Market Committee