कऱ्हाड जनता बँकेवर निर्बंध; ठेवीदारांना हजार रुपयेच काढता येणार

सचिन शिंदे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

बँकेतील ठेवीदारांच्या एका पैशालाही धक्का लागणार नाही. बँकेत कसलाही आर्थिक घोटाळा किंवा गैरव्यवहार झालेला नाही. तसा कोणताही ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवलेला नाही. मात्र पुर्वीच्या कर्जवसुलीची कामगिरी समाधानकारक नाही, असा ठपका ठेवत बँकेवर पुढील काही दिवस नविन कर्जवाटपासह विशिष्ट कारणांशिवाय ठेवादारांना ठेव रक्कम परत करण्यास निर्बंध आले आहेत. 

- राजेश पाटील-वाठारकर, अध्यक्ष, कऱ्हाड जनता बँक

कऱ्हाड : येथील कऱ्हाड जनता सहकारी बँकेची पूर्वीची थकीत कर्ज वसुली असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांच्या एनपीएचा टक्का वाढला आहे. ती गोष्ट लक्षात घेवून रिझर्व्ह बँकेने जनता बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. त्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक रिझर्व्ह बँकेने काल जारी केले आहे. बँकेला विशिष्ट कारणांशिवाय ठेवादारांना ठेव रक्कम परत करण्यास निर्बंध आणल्याचा त्यात उल्लेख आहे. त्याशिवाय नविन ठेवी घेता .येणार नाहीत. तसेच नविन कर्जेही देता येणार नाहीत. एका खात्यातून केवळ एक हजार रूपये काढण्याची परवानगी देतानाच रिझर्व्ह बँकेने आमचा पुढील आदेश येईपर्यत जनता बँकेने कोणतेही आर्थक व्यवहार करू नये, असेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

कऱ्हाड जनता बँकेची मुंबईसह पाच जिल्ह्यापेक्षाही जास्त ठिकाणी बँकेच्या 29 शाखा व दोन विस्तारीत कक्ष आहेत. बँकेचे 32 हजार 203 सभासद आहेत. त्यामुळे बँकेवर निर्बंध लादल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. रिझर्व्ह बँकेने त्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार बँकेतही लोकांची गर्दी होती. रिझर्व्ह बँकेच्या नोटीशीचीच सर्वत्र चर्चा होती. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की जनता बँकेतून एक हजार पेक्षा रक्कम कोणत्याही खात्यातून काढता येणार नाही. बँकेने कोणतेही कर्ज रेन्यू करता येणार नाही. त्याचबरोबर नवीन कर्जही देता येणार नाही. बँकेने कोणतीही गुंतवणूक करायची नाही. नवीन ठेव पावत्याही घेता येणार नाही तसेच नवीन संपत्तीची खरेदी करता येणार नाही. बँकेला कोठूनही फंड उभा करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या या निर्बंध म्हणजे बँकेची लायसन्स रद्द केले असा काढू नये. तर बँकेची आर्थिक स्थिती सुस्थितीत येईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. त्याशिवाय बँकेला बँकींग व्यवसाय करण्यासाठी काही अटीवर मुभा असणार आहे. त्यानुसार बँकेने आपली आर्थिक स्थिती सुधारावी. निर्बंध घातलेली परि;स्थिती बँकेच्या एकूण वाटचालीनुसार ठरविण्यात येईल. रिझर्व्ह बँकेने बँकींग क्षेत्रातील कायदा कलम (1) चा 35 ए या कायद्यानुसार कारवाई केली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, बँकेतील ठेवीदारांच्या एका पैशालाही धक्का लागणार नाही. बँकेत कसलाही आर्थिक घोटाळा किंवा गैरव्यवहार झालेला नाही. तसा कोणताही ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवलेला नाही. मात्र पुर्वीच्या कर्जवसुलीची कामगिरी समाधानकारक नाही, असा ठपका ठेवत बँकेवर पुढील काही दिवस नविन कर्जवाटपासह विशिष्ट कारणांशिवाय ठेवादारांना ठेव रक्कम परत करण्यास निर्बंध आले आहेत, असे जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांनी पत्रकार परिषेदत सांगितले. 

जनता सहकारी बँकेवर केवळ एक हजार रूपये काढण्याचे निर्बध रिझर्व्ह बँकेने घातले आहे. त्याची नोटीस बँकेस काल मिळाली. त्याबाबत श्री. वाठरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, बँकेवर आलेल्या संकटावर सहकार्याने मात करुन बँक सुस्थितीत आणू असा माझा आत्मविश्वास आहे. बँकेच्या अस्तित्वाला आणि ठेवीदारांच्या ठेवींना कोणत्याही प्रकारचा धोका पोचणार नाही, अशी ग्वाही देत अडचणीच्या काळात सर्वांनी संयमाने व धैर्याने साथ करावी. जनता सहकारी बँकेने आर्थीकदृष्टया सक्षम असताना पुर्वी काही प्रकल्पांना विशेषतः साखर कारखाना, फिड मिल, दुग्ध व्यवसाय, ऊस तोडणी कंत्राटदार, बांधकाम उद्योगांना कर्जपुरवठा केला होता. या कर्जदारांकडून कर्जाची व्याजासह वेळेत परतफेड करुन घेण्यात बँक अपयशी ठरल्याचा ठपका ठेवीत बँकेला रिझर्व्ह बँकेने पुढील सहा महिन्यात याबाबत आवश्यक पावले उचलण्याचे आदेश देत बँकेच्या दैनंदिन कामकाजात काही निर्बंध आणले असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कऱ्हाड जनता सहकारी बँक सद्यस्थिती

 • सभासद संख्या - 32 हजार 203
 • भाग भांडवल - 16 कोटी 87 लाख 
 • निधी - 75 कोटी 65 लाख
 • ठेवी - 657 कोटी 21 लाख
 • कर्जे - 385 कोटीं 
 • एकूण व्यवसाय - 1042 कोटी 37 लाख
 • सी.डी.रेशो - 58.60 टक्के
 • एकूण गुंतवणूक - 162 कोटी 34 लाख
 • खेळते भांडवल - 815 कोटींवर * सी.आर.ए.आर. 13.66 टक्के
 • थकबाकी - 29 कोटी 53 लाख
 • थकबाकी - 7.67 टक्के, 
 • निव्वळ एन.पी.ए. -  11.04 टक्के (38 कोटी 92 लाख 68 हजार) 
 • ऑडीट वर्ग - अ
 • ढोबळ नफा - 3 कोटी 6 लाख 6 हजार 
 • निव्वळ नफा - एक कोटी 12 लाख 76 हजार