वंचितांना रुग्णसेवा देण्याचा माझा प्रयत्न : गिरीश महाजन

मार्तंडराव बुचुडे
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

प्रत्येक तालुक्यात अशी शिबीरे व्हावीत अशी माझी संकल्पना आहे. आम्ही फक्त गर्दीवर लक्ष केंद्रीत केले नाही तर या ठिकाणी तपासणी होणा-या रुग्णांना गरज असेल तर थेट शहरात नामवंत डॉक्टरांकडून शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहे. त्यांना जाण्या-येण्याचा खर्चही करावा लागणार नाही. आगामी काही दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

राळेगणसिद्धी- "आजही समाजातील उपेक्षित व ग्रामीण भागात अनेक रुग्ण हे वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. या उपेक्षित व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करून देऊन या समाजाला न्याय देण्याचा माझा हा प्रयत्न आहे. यापुढील काळात राज्यभरात जिल्हा, तालुका व खेड्यापाड्यातही अशी शिबिरे घेतली जातील," असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. राळेगणसिद्धी येथे मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 
    
यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रविण शिंनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, गिरीश महाजन यांचे स्वीयसहाय्यक व आरोग्यदूत रामेश्वर नाईक, होमिओपॅथिक काउंन्सीलचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, शल्य चिकित्सक पांडूरंग बुरूटे, डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. संचेती, डॉ. अजय चंदणवाले, नायर हॉस्पीटल मुंबईचे हृदयरोगतज्ञ डॉ. चौरेशिया, डॉ.कोहली, डॉ. पाटणकर, डॉ. रागिणी पारेख, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. कुमार, डॉ. लक्ष्मण, डॉ. जया तोडकर, डॉ.वर्दे, अभिनंदन थोरात, सरपंच रोहीणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष विश्ननाथ कोरडे, महिला आघाडी प्रमुख अश्विणी थोरात, सरचिटणीस सुनिल थोरात, वसंत चेडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
    
महाजन पुढे म्हणाले, शहरात यापुर्वी अनेक शिबिरे घेतली. मात्र खेड्यात अशा शिबीरांची गरज आहे याची जाणीव झाल्याने यापुढील काळात खेड्यात व ग्रामीण भागात अशी शिबिरे घ्यावीत, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. प्रत्येक तालुक्यात अशी शिबीरे व्हावीत अशी माझी संकल्पना आहे. आम्ही फक्त गर्दीवर लक्ष केंद्रीत केले नाही, तर या ठिकाणी तपासणी होणा-या रुग्णांना गरज असेल तर थेट शहरात नामवंत डॉक्टरांकडून शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहे. त्यांना जाण्या-येण्याचा खर्चही करावा लागणार नाही. आगामी काही दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. हे काम सामाजिक बांधिलकीतून केले आहे. धरणे बांधून जेवढा आनंद मिळणार नाही तेवढा आनंद एका माणसाचा जिव वाचला तर मिळतो, असेही शेवटी ते म्हणाले.

जगात आनंद मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र खरा आनंद बाहेर नसून तो अंतरंगात, जनसेवेत आहे. जनसेवा नसेल तर जिवन व्यर्थ आहे. अशी शिबीरे लोक सहभागातून घेतली तर राज्य व्याधीमुक्त होण्यास वेळ लागणार नाही, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. चंदणवाले, डॉ. बोथरा, डॉ. जया तोडकर, डॉ. शिनगारे, डॉ. लहाणे यांचीही भाषणे झाली. प्रस्ताविक रामेश्वर नाईक तर आभार लाभेश औटी यांनी मानले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

    

 

Web Title: marathi News Health Camp will be held in every Taluka