जिल्हा प्रशासनात महिलाराज!

जिल्हा प्रशासनात महिलाराज!

सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराराणी अशा अनेक कर्तृत्ववान महिलांचा साताऱ्याला असलेला वारसा विविध विभागांच्या प्रशासनातील महिला अधिकारी खऱ्या अर्थाने जपत आहेत. प्रशासनात दरारा ठेवण्याबरोबरच शासकीय योजनांतून जनसेवेचा वसा जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ महिला अधिकारी पुढे नेताना दिसतात. 

सातारा जिल्ह्यातील अनेक महिला कर्तृत्ववान झाल्या. आजही उद्योगापासून संरक्षणापर्यंतच्या सर्व क्षेत्रात महिला यशाचा झेंडा फडकवत आहेत. हरणीसारखी धावणाऱ्या ललिता बाबर व जनाबाई हिरवे, तसेच नौदल, पायदळ, हवाई दलासह सामाजिक क्षेत्राबरोबरच प्रशासनातही आपला ठसा उमटवत आहेत. एवढेच नव्हे तर आता सातारा जिल्ह्यातील प्रशासनाचा कारभार ही महिला अधिकारीच हाकत आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराराणी अशा अनेक कर्तृत्ववान महिलांचा जिल्ह्याला वारसा आहे. जिल्हा प्रशासनात महत्त्वपूर्ण विभाग असलेल्या महसूल विभागातही सध्या महिलाराज आहे. महसूल प्रशासनाच्या प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी श्‍वेता  सिंघल सध्या काम पाहात आहेत. पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांनी प्रशासनात कडक शिस्त लावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख, कोरेगावच्या प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्यासोबतच उपजिल्हाधिकारी आरती भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, विशेष भूमिसंपादन अधिकारी रेखा सोळंखी, श्रीमती उंटवाल, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी मंजूषा म्हैसकर, कोरेगावच्या तहसीलदार स्मिता पवार, जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे आदी महिला अधिकारी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. सातारा सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, सातारा पाटबंधारे विभागात उपअभियंता ज्योती भिलारे, उपअभियंता अनिता माने याही महिला अधिकारी कार्यरत आहेत. एसटी विभाग नियंत्रक अमृता ताह्मणकर या काम पाहात आहेत. 

महिला पोलिस अधिकाऱ्यांची धास्ती
पोलिस अधिकारी म्हणूनही जिल्ह्यात अनेक वरिष्ठ महिला कार्यरत आहेत. त्यामध्ये उपअधीक्षक (मुख्यालय) राजलक्ष्मी शिवणकर, कोरेगावच्या उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पाटणच्या उपअधीक्षक नीता पाडवी, तसेच वैशाली पाटील, तृप्ती सोनावणे या तळबीड आणि पाचगणी पोलिस ठाण्यांचा कार्यभार संभाळत आहेत. कडक शिस्तीमुळे या महिला अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांबरोबरच बेकायदेशीर कामे करणाऱ्यांनीही धसका घेतलेला दिसतो.

देशसेवेतही आघाडीवर!
प्रशासनाबरोबरच देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी धावणाऱ्या नौदल अधिकारी धनश्री सावंत, विंग कमांडर पल्लवी धुमाळ, लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यासारख्या अनेक महिला लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com